- डॉ. मनाली महेश पवार
रक्त म्हटले की भीती ही वाटणारच. पण गर्भिणी अवस्थेत होणारा रक्तस्राव हा प्रत्येकवेळी गर्भस्राव घडवून आणतो असे नाही. योग्य तऱ्हेने गर्भिणी परिचर्येचे पालन केल्यास हा रक्तस्राव बंद होतो व गर्भाची नीट वाढ होते.
पहिल्यासारखे गर्भारपण आता नैसर्गिक राहिलेले नाही. त्यात बऱ्याच वेळा ‘गर्भधारणा’ हीच मौल्यवान गोष्ट बनते. उशिरा लग्ने, उशिरा मुले, तणावग्रस्त जीवनपद्धती, वेळच कमी पडत आहे अशा स्थितीत बाळ येण्याची चाहूल लागली की खूप काळजी घ्यावी लागते. त्यात गरोदरपणाचा काळ हा अत्यंत नाजूक असतो. बदललेल्या जीवनशैलीमुळे गर्भारपण सोपे, सहज, सुलभ राहिलेले नाही. विविध घाबरवून सोडणाऱ्या समस्या उद्भवत असतात. अशाच काही समस्यांपैकी एक मोठी समस्या म्हणजे गरोदरपणाच्या सुरुवातीच्या दिवसांत दिसून येणारी रक्तस्रावाची समस्या.
रक्त म्हटले की भीती ही वाटणारच. पण गर्भिणी अवस्थेत होणारा रक्तस्राव हा प्रत्येकवेळी गर्भस्राव घडवून आणतो असे नाही. योग्य तऱ्हेने गर्भिणी परिचर्येचे पालन केल्यास हा रक्तस्राव बंद होतो व गर्भाची नीट वाढ होते. इम्प्लांटेशन ब्लडिंग, कार्व्हिकल पॉलीप, ॲक्टोपीक प्रेग्नन्सी, ट्वीन प्रेग्नन्सी इत्यादी कारणांमुळे रक्तस्राव वा स्पॉटिंग होऊ शकते. अनेक वेळा स्त्रिया इम्प्लांटेशन रक्तस्रावाला मासिक पाळी समजतात. कारण हा रक्तस्राव गर्भ गर्भाशयात स्थापन होताना होतो. तेव्हा ती स्त्री गरोदर आहे याची तपासणीही झालेली नसते. प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावरही जर रक्तस्राव असाच चालू राहिला तर तो गर्भस्राव-सूचक असू शकतो.
- जर गर्भ कमकुवत असेल तर गर्भस्राव होतो व गर्भ जर कमकुवत नसेल तर आधुनिक शास्त्रानुसार प्रोजेस्टेरॉन इंजेक्शन, गोळ्या देऊन गर्भ टिकवला जातो व त्याची योग्यरीत्या वाढदेखील होते.
- गर्भधारणेमुळे गर्भाशयाचे मुख नाजूक होते आणि रक्तवाहिन्यांना सूज येते. त्यास थोडा जरी धक्का लागला तरी त्यामुळे रक्तस्राव होऊ शकतो. असा रक्तस्राव गर्भधारणेदरम्यान केव्हाही होऊ शकतो.
- योनिमार्गाचा संसर्ग (बॅक्टेरिअल वेजिनोसिस) असल्यास योनीमार्गातून हलके डाग पडू शकतात.
- पहिल्या तिमाहीत जर भ्रूणाचे रोपण गर्भाशयाच्या बाहेर झाले तर त्यास ‘ॲक्टोपीक प्रेग्नन्सी’ असे म्हणतात. त्यामुळे रक्तस्रावाबरोबर कंबरदुखी व पोटदुखी होते. काही वेळा गुदद्वारावर दाब येतो, चक्कर येते व बेशुद्धसुद्धा पडण्याची वेळ येते. हा गर्भ शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढला जातो.
- मोलर प्रेग्नन्सी ही खूप दुर्मीळ अवस्था आहे. यामध्ये नाळेमध्ये सिस्ट तयार होतात आणि त्यामुळे विकृत भ्रूणाची निर्मिती होते. यात रक्तस्राव होतो.
- कधीकधी भ्रूणाच्या गुणसूत्रांमधील दोषांमुळेदेखील रक्तस्राव होतो.
- गर्भारपणात फायब्रॉइड असल्यासदेखील योनीगत रक्तस्राव होतो.
- गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यावर रक्तस्रावाचे सर्वसामान्य कारण म्हणजे नाळेमध्ये दोष असणे. काहीवेळा नाळ गर्भाशयाचे मुख अर्धवट किंवा संपूर्ण झाकून टाकते. यामुळेसुद्धा रक्तस्राव होतो. त्यास ‘प्लेसेंटा प्रिव्हिया’ म्हणतात. यात नाळेच्या काही रक्तवाहिन्या फुटतात.
- काहीवेळा नाळ गर्भाशयाच्या भित्तिकांपासून विलग होते आणि नाळ व गर्भाशयामध्ये रक्त येते. याला ‘प्लेसेंटल अब्रप्शन’ म्हणतात. हे उच्च रक्तदाब, आघात झाल्यास पाहायला मिळते.
हल्ली सोनोग्राफीची सोय असल्याने व विविध रक्तचाचण्यांद्वारे गर्भारपणामध्ये रक्तस्राव होण्याचे कारण समजते. त्यामुळे योग्य चिकित्सा केल्यास रक्तस्राव, गर्भस्राव टाळता येतो.
आयुर्वेदशास्त्राप्रमाणे गर्भिणीला दिवस राहिल्यावर ‘आर्तव अदर्शनम्’ हे पहिले लक्षण असल्यामुळे गर्भिणी अवस्थेत कोणत्याही स्वरूपात रक्तस्राव होणे योग्य नाही. हे संचित आर्तव मासानुमासिक गर्भवृद्धीसाठी उपयोगी पडते. त्या संचित आर्तवाचे तीन भाग होतात जे गर्भपोषण, अपयनिर्मिती आणि दुग्धनिर्मितीसाठी उपयोगी पडतात. स्वाभाविक परिस्थितीत दिवस राहिल्यावर योनीगत स्राव होत नाही.
गर्भिणी परिचर्येचे पालन न केल्यास, वर्ज्य आहारविहाराचे सेवन केल्यास दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यात योनीगत रक्तस्राव होतो. अशा स्थितीत प्राकृत प्रसवावस्था येण्यापूर्वीच गर्भ पडून जातो. त्या रक्ताबरोबर गर्भाचा स्राव होतो.
या योनीगत स्त्रावाबरोबर बस्ती, पार्श्व, योनी व योनिमुखाच्या भागी शूल असल्यास व रक्तदर्शन झाल्यास गर्भस्राव होतो. गर्भधारणा झाल्यानंतर कोणत्याही प्रकाराने रक्तदर्शन झाल्यास ते गर्भस्रावाचे लक्षण ठरते.
आयुर्वेदशास्त्रामध्ये दर महिन्याला गर्भिणीला रक्तस्राव झाल्यास विविध काढे सांगितले आहेत. - यष्टिमधू तूप-साखरेबरोबर द्यावे.
- अतिशय थंड पाण्याच्या घड्या पोटावर ठेवाव्या.
- नाभीच्या खाली शतघौत घृताचा लेप लावावा.
- अत्यंत थंड पिचू किंवा न्यग्रोधादि गणाने सिद्ध केलेल्या घृताचा पिचू योनीभागी ठेवावा.
- पद्म, उत्पल, कुमुद, केशर यांचा कल्प साखरेबरोबर द्यावा.
- शिंगाडा, पुष्करबीज, कमळ, कमळाचे मूळ, औदुंबराचे कच्चे फळ, वडाचे कोंब शेळीच्या दुधाबरोबर वाटून ते खावे.
- गर्भिणीला अशा अवस्थेत दुधावर ठेवावे.
- तांदळाची पिठी लावून दूधपाक द्यावा.
- औषधांमध्ये कामदुधा, मौक्तिक कामदुधा, शतघौत घृत, यष्टीमधू घृत, ब्राह्मी, शतावरी, अपराजिता या गर्भस्थापक औषधांचा उपयोग साखरेबरोबर करावा.
- यष्टीमधू, शतावरी, गैटिक इत्यादीचा उपयोग करावा.
- अंतर्गत ओएस बंद असल्यास बाह्य रक्तस्राव आहे असे समजून त्या प्रकारची औषधयोजना करावी. या ठिकाणी जीवनीय, बृहणीय आणि गर्भस्थापक औषधांचा वापर करावा.
आधुनिक शास्त्रानुसार विवृतास्यत्त्व असल्यास टाका घालतात व नवव्या महिन्यात तो काढून टाकतात. त्यामुळे गर्भाची पूर्ण वाढ होऊन प्राकृत प्रसव होतो. - शतावरी, अश्वगंधा, यष्टीमधू, नागकेशर, घायटीची फुले, वेलदोडा यांची चूर्णे साखरेबरोबर द्यावीत.
- पाचव्या-सहाव्या महिन्यात रक्तदर्शन झाल्यास गर्भाशयमुखाचे विवृत्तास्यत्त्व आहे की नाही हे बघून गर्भिणीला पूर्ण विश्रांती द्यावी. गर्भस्थापक व रक्तस्तंभक चिकित्सा द्यावी.
- आकस्मिक मानसिक आघात, शोक, भय, उदरावर आघात किंवा पाय घसरून पडणे यामुळे योनीगत रक्तदर्शन झाल्यास रक्तस्तंभक औषधे देऊन पूर्ण विश्रांती (बेड रेस्ट) घ्यावी.
- गर्भारपणात कोणत्याही वेळी रक्तदर्शन झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सोनोग्राफीसारख्या तपासण्या करून घ्याव्यात. औषधोपचारांबरोबर पूर्ण बेड रेस्ट ही महत्त्वाची चिकित्सा आहे.
- सातव्या किंवा आठव्या महिन्यात मूत्रवह स्रोतसाची दुष्टी झाल्यास, वात विगुण झाल्यास, बीपी वाढल्यास, मानसिक आघात झाल्यास रक्तदर्शन होते. त्यामुळे प्रसव होतो. अपत्त्याचे वजन ठीक असल्यास ते जगू शकते. नाजूक असल्यास बालकाला एनआयसीयू इनक्यूबेटरमध्ये ठेवल्यास ते जगू शकते.
अशा प्रकारे नऊ महिने पूर्ण होण्यापूर्वी योनीगत रक्तस्राव झाल्यास त्याकडे तातडीने लक्ष पुरवणे आवश्यक असते. आयुर्वेदशास्त्रामध्ये मासानुमासिक काढे सांगितले आहेत, ते योग्य स्त्रीरोगतज्ज्ञाच्या सल्ल्याने घ्यावेत.