पावसाने रविवारपासून दाखवलेल्या रौद्ररूपामुळे गोव्यात ठिकठिकाणी छोट्यामोठ्या दुर्घटना घडल्या. कोठे भिंत कोसळली, कोठे दरडी कोसळल्या, कोठे पूल पाण्याखाली गेले, तर कोठे रस्ते पावसाच्या पाण्यात दिसेनासे झाले. ज्या प्रचंड प्रमाणात रविवारी राज्यभरात पाऊस झाला, ते पाहिल्यास अशा दुर्घटना अटळ होत्या. प्रशासनाने हवामान खात्याच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सोमवारी शाळांना तत्परतेने सुटी जाहीर केली. अर्थात, हवामानाचे अंदाज क्षणाक्षणाला बदलत असतात, त्यामुळे रविवारी जे घडले त्याची पुनरावृत्ती सोमवारी झाली नाही. पण अनेक भागांत रविवारच्या मुसळधार पावसात साचलेले पाणी सोमवारी सकाळीही कायम असल्याने ही सुटी दिल्याने सकाळी सकाळी मुलांना शाळेत सोडायला जाणाऱ्या पालकांमुळे होणारी वाहतुकीची कोंडी टळू शकली हेही तितकेच खरे. रविवारच्या मुसळधार पावसामध्ये ठिकठिकाणी जे घडले त्यापासून बोध घेऊन उपाययोजना आता गरजेच्या आहेत. त्या दिवशी पावसामुळे कोने – प्रियोळ, मालपे – पेडणे, विर्डी – साखळी अशा अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या. गोव्यात ठिकठिकाणी रस्त्यांसाठी डोंगर फोडून वाट काढली गेली आहे. महामार्ग विस्ताराचे काम हाती घेतले जाते तेव्हा हे डोंगर अधिकाधिक पोखरले जातात. गोव्याची माती मुळातच ठिसूळ असल्याने पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका संभवतो. कोकण रेल्वेने ज्या प्रकारे सतत कोसळणाऱ्या दरडी रोखण्यासाठी जाळ्या लावल्या आहेत, तशा प्रकारच्या जाळ्या किमान महत्त्वाच्या व वर्दळीच्या महामार्गांवर जेथे उंच डोंगर फोडून रूंदीकरण झालेले आहे, तेथे दोन्ही बाजूंना डोंगरकड्यांना बसवायला हव्यात. अन्यथा एखादेवेळी चालत्या वाहनांवर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते. काही दिवसांपूर्वी नव्याने बांधलेला राष्ट्रीय महामार्गाचा भाग पेडणे तालुक्यात कोसळला होता. तशा प्रकारची दुर्घटना कुठे होणार नाही ह्यासाठी ठिकठिकाणी नव्या महामार्गांच्या मजबुतीची तपासणी आवश्यक आहे. गोवा हा नद्यांनी वेढलेला प्रदेश आहे. त्यामुळे अशा मुसळधार पावसानंतर ठिकठिकाणी नद्यांना पूर येणे अगदी स्वाभाविकच असते. रविवारच्या बेफाट पावसामुळे ठिकठिकाणी पूर आला, पूल पाण्याखाली गेले. अशावेळी नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःच काळजी घेणे अपेक्षित असते. सगळे काही सरकारच्या माथी मारून आपण बेजबाबदारपणा करायचा हे योग्य नाही. नानोडा येथे पुराच्या पाण्यात घातलेली एक जीप वाहून जाण्याचा प्रकार घडला. स्थानिक नागरिकांनी धोक्याचा इशारा दिलेला असतानाही हे वाहन पाण्यात घालणाऱ्या संबंधित चालकाविरुद्ध पोलिसांनी सहप्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करावा, तरच अशा प्रकारांची पुनरावृत्ती करण्यास कोणी धजावणार नाही. तीच गोष्ट पाली येथील धबधब्यावर जो प्रकार झाला त्याची. मुळात पावसाळ्यात धबधब्यांवर जाण्यास सरकारने स्पष्ट मनाई केलेली असताना पाली येथील शिवलिंग धबधब्यावर हे तथाकथित पर्यटक गेलेच कसे? शेवटी त्यांना वाचवण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना धाव घेऊन आपला जीव संकटात टाकावा लागला. सरकारने धबधब्यांवर जाण्यास मनाई केलेली असताना देखील तेथे हट्टाने जाणाऱ्या अशा उचापतखोरांवरही कारवाई झाली पाहिजे. ह्या मंडळींपैकी काहीजण ह्यावेळी वाहून गेले असते तर? त्याचे खापर प्रशासनावर आले असते. कुंडईत आयडीसीची भिंत कोसळून तीन कामगारांचा बळी गेला, ती दुर्घटनाही पुरेशी खबरदारी घेतली गेली असती तर कदाचित टाळता येऊ शकली असती. जोराचा पाऊस झाला की शहरांतील रस्ते पाण्याखाली जाणे हा प्रकार आपल्याकडे नेहमीच दिसतो. पणजी शहर स्मार्ट बनवायची धडपड गेली काही वर्षे चाललेली आहे, परंतु ह्या स्मार्टनेसचा बोजवारा जरासा जोराचा पाऊस झाला की उडताना दिसतो. कांपाल, मिरामार, पाटो आदी परिसर मुसळधार पावसामुळे पूर्ण पाण्याखाली गेले. भरतीच्या पाण्याचा निचरा करण्याची पोर्तुगीजकालीन भूमीगत व्यवस्था असलेल्या भागांमध्ये मात्र पाणी साचत नाही हे लक्षात घेण्याजोगे आहे. कितीही पाऊस झाला तरी रायबंदरचा कॉजवे कधीही पाण्याखाली जात नाही, कारण त्यामागे तसे नियोजन आहे. नव्या जमान्यात मात्र अशा प्रकारचे कोणतेही नियोजन न करता, हवामानाचा, पाऊसपाण्याचा विचार न करता बांधकामे होतात आणि मग पावसाळ्यात त्रेधा उडते. कला अकादमीचे नूतनीकरण हे त्याचे ताजे उदाहरण आहे. त्यामुळे गोव्याची भौगोलिक स्थिती लक्षात घेता पाऊस कधी ना कधी रौद्ररूप घेणारच. परंतु त्यानंतर उद्भवणाऱ्या समस्यांपासून बोध घेऊन त्या दुर्घटनांची पुनरावृत्ती होणार नाही ह्यासाठीची काळजी घेणे नक्कीच आपल्या हाती आहे.