गत पंधरवड्यात विक्रमी 45 इंच पाऊस

0
14

राज्यात जुलै महिन्यातील पहिल्या 15 दिवसांत विक्रमी 45 इंच पावसाची नोंद झाली. राज्यात पावसाळी हंगामातील 45 दिवसांत आत्तापर्यंत एकूण 84 इंच पावसाची नोंद झाली असून, पावसाचे प्रमाण 45.8 टक्के जास्त आहे. राज्यात जून महिन्यात एकूण 38 इंच पावसाची नोंद झाली होती.

येथील हवामान विभागाने राज्यात बुधवार दि. 17 जुलैला पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. समुद्रकिनारी भागात उंच लाटा उसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उत्तर गोव्यातील शापोरा ते पणजी आणि दक्षिण गोव्यातील वास्को ते कोळंब या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यभरात चोवीस तासांत एकूण 4.75 इंच पावसाची नोंद झाली असून पावसाचा जोर कायम आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. जोरदार पावसामुळे राज्यभरात झाडांची पडझड सुरूच आहे. या जुलै महिन्यात जोरदार पावसामुळे आत्तापर्यंत दोन वेळा विविध भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती.

राज्यात मागील चोवीस तासांत काणकोण, पणजी, जुने गोवे, केपे, फोंडा आदी भागात जोरदार पावसाची नोंद झाली. चोवीस तासांत काणकोण येथे सर्वाधिक 7.32 इंच पावसाची नोंद झाली. केपे येथे 5.13 इंच, म्हापसा येथे 3.44 इंच, पेडणे येथे 3.24, फोंडा येथे 5.81 इंच, पणजी येथे 6.97 इंच, जुने गोवे येथे 5.53 इंच, साखळी येथे 2.56 इंच, वाळपई येथे 1.30 इंच, दाबोळी येथे 4.45 इंच, मुरगाव येथे 5.37 इंच, मडगाव येथे 4.72 इंच आणि सांगे येथे 4.81 इंच पाऊस कोसळला. या जोरदार पावसाचा फटका शेतीला बसला आहे.