पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘गती शक्ती’ या कनेक्टिव्हीटीसाठीच्या मल्टी मॉडेल नॅशनल मास्टर प्लॅनच्या उद्घाटन सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे काल व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी झाले होते.
या मास्टर प्लॅनचा शुभारंभ केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले. या नव्या तंत्रज्ञानामुळे सर्व संबंधित कनेक्टिव्हीटीच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करू शकतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
‘गती शक्ती’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत योजनेचा महत्त्वाचा भाग असून ५ ट्रिलिएन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार करण्याच्या प्रयत्नांचा एक मोठा भाग असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. कोविड महामारीमुळे कोसळलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देऊन ही अर्थव्यवस्था ५ ट्रिलिएन डॉलर्सवर नेणे या उपक्रमामुळे शक्य होणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.