गणेश चतुर्थी विशेष – श्रीगणेशाचा विश्‍वसंचार

0
917

– दत्ता भि. नाईक
एकोणीसशे पंच्याण्णवनंतर यंदा दोन हजार चौदा साली पुन्हा एकदा गणेशचतुर्थी २९ ऑगस्टला येत आहे. दर एकोणीस वर्षांनी येणारा हा योग म्हणजे केवळ योगायोग नव्हे; आपल्या पूर्वजांनी सूर्य व चंद्र यांचा जो अभ्यास केलेला आहे, त्यामुळे हा ठरल्याप्रमाणे सातत्याने घडणारा योग आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव गणेशाचे पूजन करण्याची परंपरा आहे. गणपती हा विशेषत्वाने महाराष्ट्रात अधिक प्रमाणात पुजला जातो. कोकणात व गोव्यात गणपतीला ज्ञान, कर्म व भक्ती या तिन्ही मार्ग अनुसरणार्‍यांच्या दृष्टीने महत्त्व आहे.
घरोघरी गणपतीची पूजा करण्याबरोबरच स्वातंत्र्यचळवळीच्या काळात जनजागृतीसाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवास प्रेरणा दिली. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाजजागृती करण्यासाठी व्याख्याने, राष्ट्रीय कीर्तनकारांची कीर्तने, प्रवचने आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाऊ लागले. इंग्रज राज्यकर्त्यांची या कार्यक्रमांवर करडी नजर असली तरीही धार्मिक भावना दुखावण्याचा धोका ते पत्करत नसत.
वेद, शास्त्र, पुराण
वेदांच्या काळात आजच्यासारखी मूर्तिपूजा नव्हती. पंचमहाभूतांची म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश यांची प्रार्थना केली जात असे. इंद्र, वरुण, अग्नी आदी देवांची स्तवने म्हटली जात असत. या काळात यज्ञ व हवन यांचाच बोलबाला होता. पूजाविधी वगैरे गोष्टी होत्या असेे वाटत नाही. सामान्य लोकांना वेदांतील तत्त्वज्ञान समजणार नाही अशी शंका उपस्थित झाल्यामुळेच वेदांचे संकलन करणार्‍या व्यासमुनीनी पुराणांची रचना केली व यात पौराणिक देवदेवतांची वर्णने आली.
गणपती या देवतेचा उल्लेख अथर्ववेदात आढळतो. ‘गणपती अथर्वशीर्ष’ हा या वेदाचा अविभाज्य भाग आहे. यात गणपतीला ‘तत्वमसि, त्वमेव केवलं ब्रह्मासि’ असे म्हटलेले आहे. म्हणजे गणपती हा अद्वैत तत्त्वज्ञान मानणार्‍यांनी स्वीकृत केलेला देव आहे हे यावरून सिद्ध होते. यात गणेशगायत्रीही आहे. गणपतीला सर्व सृष्टीचा कर्ताधर्ता व संरक्षक अशी विशेषणे येथे लावलेली आढळतात. अथर्ववेद हा उशिरा निर्माण केलेला वेद आहे. सुरुवातीला तीनच वेद होते असे विद्वानांचे मत आहे. यानुसार ऋग्वेद, सामवेद व यजुर्वेद या तीन वेदांमध्ये गणपतीचा उल्लेख आढळत नाही.
सर्व प्राचीन ग्रंथ, म्हणजे वेद धरून शास्त्रे आणि पुराणे लिहून काढण्याकरिता व्यास महर्षींनी गणपतीला नियुक्त केले होते. अथर्वशीर्षाचा अतिरिक्त लेखनिक म्हणून गणपतीचा सर्व वेदांशी संबंध येतो. यामुळे गणपतीचा उल्लेख केल्याशिवाय कोणत्याही वेदाचे अध्ययन केले जाऊ शकत नाही.
मूळ गणपती हा काश्यप ऋषींची पत्नी अदिती हिचा पुत्र आहे. तो दिवस होता माघ शुक्ल चतुर्थी म्हणून या दिवशी गणेशजयंती साजरी केली जाते. जिथे जिथे गणेशमंदिरे आहेत, तिथे तिथे ही चतुर्थी पाळली जाते. मंदिरांतील गणपती डावीकडे वा उजवीकडे झुकलेल्या सोंडेचा असू शकतो. परंतु घरोघर बसवला जाणारा गणपती हा डाव्या सोंडेचाच असावा असा नियम आहे व तो काटेकोरपणे पाळला जातो.
मंदिरातील काय, घरोघरी बसवलेला काय वा सार्वजनिक ठिकाणी पूजेला लावलेला काय- गणपती हा शास्त्रोक्त व विधियुक्त पद्धतीने पूजला जातो. थोड्याफार फरकाने वेगवेगळ्या ठिकाणी गणपतीची पूजा करण्याची पद्धत सारखीच आहे.
गणपतीचा प्रामुख्याने उल्लेख येतो तो गणेशपुराणात. भगवान वेद व्यासांनी सुरुवातीला विघ्नहर्त्या गणपतीस वंदन करून गणेशपुराणाची सुरुवात केलेली आहे. गणेशपुराण हे सर्वप्रथम ब्रह्मदेवाने व्यासमुनींना सांगितले. नंतर व्यासमुनीनी ते भृगू ऋषीस सांगितले. हे पुराण भृगू ऋषींनी सोमकांत राजाला समजावून सांगितले व सूतानी सर्व समाजाला उद्देशून ही पुराणकथा सांगितली असा या पुराणाच्या सुरुवातीसच उल्लेख आहे. या पुराणानुसार ब्रह्मदेव, विष्णू आणि शिव हे तिन्ही देव गणपतीचे श्रेष्ठत्व मानतात हे लक्षात येते. याशिवाय जवळ जवळ सर्व पुराणांतून गणेशाचा उल्लेख येतो. यांतील प्रामुख्याने उल्लेख करण्यासारखी पुराणे म्हणजे पद्मपुराण, शिवपुराण, ब्रह्मपुराण व स्कंदपुराण. हिंदूंच्या धर्मपरंपरेप्रमाणे वेदशास्त्र आणि पुराण या तिन्ही प्रमाणांनुसार गणपती हा सर्वमान्य देव आहे.
ज्ञान, कर्म व भक्तिमार्ग
ज्येष्ठांनी ईश्‍वरप्राप्तीचे तीन मार्ग सांगितलेले आहेत. ते आहेत- ज्ञानमार्ग, कर्ममार्ग व भक्तिमार्ग. वेदांतील अखेरचा भाग हा ज्ञानमार्ग सांगणारा आहे. गणपती अथर्वशीर्ष गणपतीचा ज्या शब्दांत उल्लेख करते त्यावरून हा शुद्ध ज्ञानमार्ग आहे हे लक्षात येते. यानुसार गणपती हा सर्वव्यापी आहे, तो अव्यक्त रूपात सर्वत्र वास करत असून त्याची आपण दूर्वा वगैरेनी व्यक्त रूपात पूजा करतो. ‘त्वं ज्ञान मयो, विज्ञान मयो सि’ असाही त्याचा उल्लेख आहे. अज्ञानाचा पडदा बाजूला सारून त्याचे ज्ञान प्राप्त केले जाऊ शकते असाच याचा अर्थ होतो.
गणपतीच्या पूजेचे कर्मकांड फार मोठे आहे. एक तर घरात बसवण्याचा गणपती डाव्या सोंडेचा असला पाहिजे. त्याला बेशिस्त चालत नाही. तो गण-नायक आहे. सेनेचे गण, वाहिनी, अनिकिनी, प्राणिकिनी, ध्वजिनी व अक्षौहिणी ही रचना त्याच्यापासून सुरू झाली म्हणून एका अर्थाने तो लष्करी शिस्तीचा देव आहे. त्याची मूर्ती थोडीशी जरी भग्न झाली तर पूजेला लावता येत नाही. पार्थिव मूर्ती पुन्हा मातीत मिसळवली पाहिजे म्हणून तिचे पाण्यातच विसर्जन करावे असा संकेत आहे.
गणपती हा सर्वसामान्य माणसांचा देव आहे. त्याची पूजा कोणीही करू शकतो. त्याच्यासमोर त्याची आरती करावी व प्रसाद वाटावा. भजने म्हणावी. महिलांनी फुगड्या घालाव्या. ही प्रथा भक्तिमार्गाचे प्रतीक आहे. ज्ञान व कर्म यांना एक मर्यादा आहे; भक्तीला कोणतीही मर्यादा नाही. भक्ती चोवीस तास केली जाऊ शकते. सर्व विद्यांचा देव असलेला गणपती ब्रह्मदेव, विष्णू व शिव या तिन्ही देवांचे एकत्रित प्रतीक आहे, तो ऋद्धी, सिद्धीचा पती आहे म्हणून त्याच्याकडून भक्तिभावाने जे मागितले जाते ते मिळते अशी श्रद्धा आहे. गणपती हा लहान मुलांसाठी अतिशय प्रिय असा देव आहे. त्याला व्यंगभक्ती चालते. त्याच्या मोठ्या पोटावर व्यंगात्मक कवने केल्यास तो रागावत नाही, कोणतेही मोठे अरिष्ट तो नाहीसे करतो, हा भाव जनमानसांत रूढ असल्यामुळे तो भक्तिमार्गाचाही देव आहे.
सामाजिक संदर्भ
पं. वि. दा. सातवळेकर यांनी बर्‍याच पौराणिक कथांमध्ये सामाजिक संदर्भ असल्याचे सिद्ध केले आहे. ऋतुकेतू व शारदा या ब्राह्मण दांपत्याच्या पोटी देवांतक व नरांतक हे दोन पुत्र जन्माला आले. त्यांनी भूतदेशात म्हणजे आजच्या भूतान देशात शिक्षण घेतले. तेथे असुर म्हणजे असिरियन व राक्षस म्हणजे रशियन विद्यार्थीही शिकावयास आले असता त्यांच्याशी संगनमत करून या दोन्ही ब्राह्मणपुत्रांनी भारत देशावर आक्रमण केले. तेव्हा गणपतीने महोत्कट या नावाने काश्यप-अदितीच्या पोटी जन्म घेतला व हे आक्रमण परतवून लावले, हा त्यांनी या कथेचा लावलेला अर्थ आहे.
भाद्रपदात पूजला जाणारा गणपती हा शिव-पार्वतीचा पुत्र आहे. त्याला पार्वतीने स्वतःच्या अंगावरील चिखलापासून बनवले. त्याचा शंकराने शिरच्छेद केल्यामुळे त्याला हत्तीचे तोंड बसवण्यात आले. ही कथा सर्वज्ञात असल्याने त्या घटनेचे विस्ताराने वर्णन करण्याची आवश्यकता नाही.
कोकणात व गोव्यात गणेशोत्सवाला एक सामाजिक संदर्भ आहे. येथील लोक भाड्याच्या घरात गणपती ठेवत नाहीत. याशिवाय आपल्या मूळ गावी वर्षातून एकदा भेट देऊन यावे हाही यामागील हेतू असतो. या वेळेस वर्षभर ओस पडलेली जुनी घरे, वाडे लोकांच्या गर्दीने गजबजतात. गोव्यात तर दिवाळीपेक्षाही गणेशचतुर्थीला जास्त प्रमाणात रोषणाई व फटाक्यांची आतषबाजी असते.
संतांना भावलेला गणेश
कोणत्याही धार्मिक ग्रंथाची सुरुवात गणेशवंदनेशिवाय होऊ शकत नाही. संत ज्ञानेश्‍वरांनी भावार्थदीपिकेची सुरुवात गणेशवंदनेने केलेली आहे. ग्रंथाच्या पहिल्या एकोणीस ओव्यांमधून गणपतीचे वर्णन केलेले आहे. त्याला ज्ञानेश्‍वर ‘ॐ नमोजी आद्या| वेद प्रतिपाद्या॥ जय जय स्वसंवेद्या| आत्मरूपा॥ असे म्हणून आळवतात. हा सकलमती प्रकाश आहे. अष्टादश पुराणे ही त्याची मणीभूषणे आहेत. त्याच्या सर्व आभूषणांमध्ये बौद्धमत आहे, सत्कार्यवाद आहे. ॐकाररूपी गणेशाचे वर्णन करताना ज्ञानेश्‍वर महाराज म्हणतात- ‘अकार चरणयुगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल, मस्तकाकारे.’
एकनाथ महाराजांनी ‘ओंकार स्वरूपा, सद्गुरू समर्था, अनाथांच्या नाथा, तुज नमो’ असे म्हणून त्याला आळवले आहे. एकनाथी भागवतात नाथ म्हणतात, ‘तुज देखे जो नरू, त्याची सुखाचा होय संसारू, या लागी विघ्नहरू, नामादरू तुज साजे.’ ‘तुझ्या पायाशी प्रकृती व पुरुष दोन्ही लोळण घेतात. सूक्ष्माहून सूक्ष्म प्राण्यांवर तुझे लक्ष असते म्हणून मूषक हे तुझे वाहन आहे’ असे एकनाथ गणेशाचे वर्णन करताना म्हणतात.
‘धरोनिया फरश करी, भक्तजनांची विघ्ने वारी| ऐसा गजानन महाराजा, त्याचे चरणी लाहो लागो माझा| सेंदूर शमी बहुप्रिय त्याला, तुरा दुर्वांचा शोभला| उंदीर असे ज्याचे वाहन, जडित मुगुट पूर्ण| नाग यज्ञोपवित रुळे, शुभ्र वस्त्र शोभित साजिरे| भाव मोदक हराभरी, तुका भावे हे पूजा करी|’ हा तुकाराम महाराजांनी गणपतीला उद्देशून लिहिलेला अभंग आहे.
तुकाराम हा वैष्णव संत आहे. भगवान श्रीकृष्ण सोडून अन्य देवतांना उद्देशून त्यांनी अत्यल्प साहित्य लिहिलेले आहे. म्हणूनच या अभंगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तो भक्तजनांची विघ्ने नाहीशी करणारा देव, शेंदूर- शमी- दुर्वा- मुकुट- वाहन- नागरूपी जानवे या सर्व गोष्टींचा उल्लेख या भक्तीने ओतप्रोत भरलेल्या अभंगात आलेला आहे.
समर्थ रामदासांनी लिहिलेली ‘सुखकर्ता दुखहर्ता’ ही आरती तोंडपाठ नसेल असा महाराष्ट्र व गोव्यातील गणेशभक्त शोधूनही सापडणार नाही. गणपतीचे अगदी थोडक्यात वर्णन रामदासांनी या एका आरतीतून केलेले आहे. ‘दासबोधा’त समर्थ रामदासांनी गणपतीला ‘सर्व सिद्धी फलदायक’ असे म्हटलेले आहे. तो विघ्नहर असून अनाथांचे माहेर आहे. म्हणून हरी व हर त्याचे वंदन करतात. तो चौदा विद्यांचा गोसावी असून नाना छंदांच्या आधारे नृत्य करणारा आहे. समर्थ पुढे म्हणतात, ‘ऐसा गणेश मंगलमूर्ती| तो म्यां स्रविला यथामती| वांछा धरून चित्ती| परमार्थाची॥
गणपतीकडून लाघवी बुद्धीची मागणी करताना समर्थ म्हणतात, ‘गणपती मति दे मजला धवी| जनकजापतिचा लघुसा कवी| विनवितो करणालय करणा| परम सुंदर दे मज धारणा॥ (जनकजापतीचा म्हणजे श्रीरामाचा लहानसा कवी तुझ्याजवळ लाघवी मती मागतो, म्हणून हे करणालया सागरा, मला अतिसुंदर अशी कल्पना दे.)
विश्‍वव्यापी श्रीगणेश
श्रीगणेश हा शिवपुत्र असल्यामुळे त्याच्या हातात त्रिशूल असतो. जमदग्नीची पत्नी रेणुका हिने काश्यपपुत्र म्हणून त्याला परशू दिलेला आहे. पाश व अंकुश ही गणेशाच्या हातात नेहमीच दिसणारी शस्त्रे आहेत. पाश हे सूर्याने वा वरुणाने त्याला दिलेले आयुध असून कधीकधी मुद्गरही धारण केलेला श्रीगणेश दिसतो. खट्‌वांग, खेटक ही चारपेक्षा अधिक हात असलेल्या गणपतीजवळ दिसून येतात.
गणपतीची देशभरात बरीच मंदिरे आहेत. त्यांपैकी एकवीस ही गणेशाची मूळ स्थाने मानली जातात. त्यांतील आठ एकट्या महाराष्ट्रात असून त्यांना ‘अष्टविनायक’ या नावाने ओळखले जाते.
याशिवाय विश्‍वातील जवळ जवळ सर्वच देशांत गणपतीच्या चांगल्या स्थितीत वा भग्न अवस्थेत मूर्ती सापडतात. भारताचे एकेकाळी भाग असलेल्या तिबेट, म्यानमार, पाकिस्तान, बांगला देश व श्रीलंका या देशांत तर गणपतीची स्थाने आहेतच, याशिवाय कंबोडिया देशात असलेली दोन हातांच्या गणपतीची पंचरसी मूर्ती सामान्य सनाच्या नवव्या शतकातली आहे. व्हिएतनाममध्ये कंडल येथे चतुर्मुखी गणेशमूर्ती सापडलेली आहे. बाली बेटावरील देसांजेबरन् येथे दोन हातांच्या गणपतीची तेथील हिंदूंकडून पूजा केली जाते. बाली बेट हे इंडोनेशियाचा भाग आहे. इंडोनेशियातही ठिकठिकाणच्या उत्खननात गणेशमूर्ती सापडलेल्या आहेत. जपानमध्येही वेगवेगळ्या ठिकाणी गणेशमूर्ती सापडल्या असून कांगितेन पंथाची ही उपास्य देवता आहे. एलिस गेटी यांनी लिहिलेल्या ग्रंथात सोनेरी वर्ख असलेल्या चिनी गणेशमूर्तीचे वर्णन केलेले आहे.
युरोपमध्ये ख्रिस्ती संप्रदायाने प्रवेश केल्यापासून व पश्‍चिम आशियामध्ये इस्लामची स्थापना झाल्यापासून तेथील मूर्तींचा निर्ममपणे विध्वंस करण्यात आल्यामुळे तेथील माहिती मिळणे कठीण आहे. परंतु युरोपमधील अजूनही जिवंत असलेल्या पॅगन पंथीयांकडून विशेष माहिती मिळू शकते. अमेरिकेत युरोपीयन लोकांचा प्रवेश होण्यापूर्वी तेथे गणेशपूजा चालू होती याचे पुरावे मिळतात. गौरवर्णीयांनी केलेल्या नरसंहार व विध्वंसानंतरही मेक्सिकोमध्ये गणेशमूर्ती सापडलेली आहे. यावरून श्रीगणेश विश्‍वव्यापी देव असून गजमुख असलेल्या या देवाची अख्या पृथ्वितलावर त्यांच्या-त्यांच्या पद्धतीने पूजाअर्चा होत होती. असा होता श्रीगणेशाचा विश्‍वसंचार.