– सौ. लक्ष्मी जोग
वर्षा ऋतू मेघमल्हार आळवीत येतो. अवनीचा कणन्कण आनंदाने तरारून उठतो. वर्षाराणीमुळे भूमी खर्या अर्थाने सुजलाम् सुफलाम् होते. न्हात्या-धुत्या झालेल्या सृष्टीची सुंंदरता ऐन भरात येते. झाडाझुडपांपासून ते चिमुकल्या तृणपात्यापर्यंत जणू सौंदर्यस्पर्धा लागलेली असते. एखाद्या टिंबासारख्या दिसणार्या पांढर्याशुभ्र मोत्यांप्रमाणे चमकणार्या असंख्य कळ्या अंग-प्रत्यंगावर लेवून तृप्त अनंत डौलात उभा असतो. हिरव्यागार टिकल्यांच्या पर्णसंभारातून पिवळ्या व लाल शंकराचे तुरे डोकावत असतात. हिरव्यागार लांबट पानांच्या वेलींवर झुपक्यांनी फुललेले करंडे, सोनचाफा, नागचाफा, लालचुटूक जास्वंद अशी अनेकविध रंगांची, गंधांची पुष्पमंडळी स्पर्धेत उतरली. त्यात जाई-जुई ही नाजूक फुलेही मागे नव्हती. कारण त्यांच्याजवळ सुगंधाचा खजिनाही जोडीला होता. त्यामुळे त्यांचे पारडे जड होते. आता वारा सुगंधाची स्पर्धाही जाहीर करतो. त्यात केवडा प्रमुख असतो. कारण त्याच्या संग्रही अनेक अत्तरकुप्या होत्या. त्या काटेरी पानांआड दडवलेल्या असतात. त्या शोधताना मुलींची त्रेधातिरपीट उडते आणि ही गंमत पहायला वार्याला फार आवडते. लहानमोठ्या वेलींनी तर खूपच धांगडधिंगा घातला होता. लहानमोठ्या सर्व वनस्पतींना स्पर्धेचे आग्रहाचे आमंत्रण त्यांनी दिले होते. काही तृणपुष्पांनी तर तयारीही केली होती, तर काही स्पर्धा पाहायलाच येण्याचे ठरवीत होती. आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य कमान करून स्वागताला उभे ठाकले होते. मधूनच मेघ गडगडाट करून वर्षाराणीला सलाम करत होते. ऊन-पावसाचा लपाछपीचा खेळ पाहत पाखरे आनंदाने बागडत होती. अशा या सृष्टीच्या उत्सवप्रसंगी श्रावण संपून भाद्रपद महिन्याने पदार्पण केले.
आता गणरायाच्या आगमनाचे दिवस येऊन ठेपले. सृष्टिदेवीचा हा खजिना त्याच्यासाठीच असतो. लोक त्या सर्वांची उधळण गणेशचतुर्थीत करतात. फळभाज्या व पाने यांची कलात्मक रचना करून माटोळी-मंडप बांधतात. निवडक पत्री त्याच्या आवडीच्या संख्येत त्याला अर्पण करायला पूजासाहित्यात मांडून ठेवली जाते. पांढर्याशुभ्र कापसाची एकवीस मण्यांची माळ तर माणकांच्या माळेप्रमाणे तबकात शोभत असते. एकवीस पानांचा विडा करून गणेशाच्या उजव्या बाजूला ठेवला जातो. एकवीस तर्हेची फुले, दूर्वा, आघाडा परडीत शोभत असतात. केवढं स्वागत हे! ‘‘त्वं भूमिरापो नलो निलो नभः|’’ तोच तर सर्वांमध्ये भरलेला आहे. तो कालत्रयातीत, गुणत्रयातीत! तोच सकल सृष्टीचा मूलाधार, बुद्धिदाता, कलानिधी तोच! तो शूर, तो वीर आणि पराक्रमी! गणपतीचे सर्व अवतार दीनदुबळ्यांच्या रक्षणासाठी, त्यांचे संकट निवारण करण्यासाठी झालेत. आपल्या ३३ कोटी देवांत गणेश हे सर्वाधिक प्रिय दैवत आहे. ज्ञानसंपन्न असे संपूर्ण वेदवाङ्मय हीच गणेशाची सुंदर मूर्ती आहे असे श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधातील एक समास ‘गणेशस्तवना’वर लिहिला आहे. त्यात त्यांनी श्रीगणेशाचे असे अप्रतिम वर्णन केले आहे की प्रत्यक्ष ‘श्री’ आपल्यासमोर असल्याचा भास होतो. जिज्ञासूंनी तो समास जरूर वाचावा. त्याला त्यांनी ‘लावण्यखाणी’ असे संबोधले आहे. शिवाय ‘सकल विद्यांचा आगरू’ म्हटले आहे. खरोखरच श्री गजाननाचे इतके यथार्थ वर्णन क्वचितच वाचायला मिळते. जागेअभावी इथे प्रस्तुत करता येत नाही.
श्रीगणेश चतुर्थी महाराष्ट्र व गोव्यात तर साजरी होतेच, शिवाय भारताबाहेरही अनेक देशांत गणेश पुजतात व गणेशाची मंदिरेही आहेत. गोमंतभूमीत गणेशचतुर्थी ज्या भावोत्कटतेने व उत्साहात साजरी होते तशी अन्य ठिकाणी दिसत नाही. गोमंतकीय जनता मुळातच उत्सवप्रिय. जे करतील ते यथासांग! चतुर्थी जवळ येण्याआधीच तिची लगबग सुरू होते. निरनिराळ्या रंगाची, आकाराची मखरे, कागदी माळा, रोषणाईसाठीच्या वस्तू यांनी बाजार फुलून जातो. गणपतीची मूर्ती घरात आणण्याआधीच अनेकविध प्रकारच्या फळभाज्यांची माटोळी बांधून तयार असते. अगदी घरोघरी आरास तर विचारूच नका. मिठाई, पक्वान्ने यांची रोज रेलचेल. शिवाय नातलग, मित्रमैत्रिणी यांच्या गाठीभेटी होतात. गणपतीपुढे रांगोळ्या घालतात. फुगड्या-झिम्मांचा खेळ रंगतो. आरत्यांचा जल्लोष असतो. सार्वजनिक गणेशोत्सवात अनेक प्रकारच्या स्पर्धा असतात. व्याख्याने, प्रवचने, नाटके होतात. संपूर्ण वातावरण गणेशमय झालेले असते. हवेतील कणन्कण गणेश नामाने भारलेला असतो.
काही कुटुंबांत मात्र घरात गणपती बसवण्याची परंपरा काही कारणाने नसते. काही कुटुंबातील भाऊ किंवा मुलगा गावातच राहत असतो व गणपतीला घरी येतो. हे काही अतिउत्साही लोकांना मानवत नाही. मग ते आगंतुकपणे त्यांच्या दारात गणपतीची मूर्ती व एक उदबत्तीचा पुडा आणून ठेवतात व एक फटाका उडवून घरातल्यांना जागवतात व ओळख न दाखवता निघून जातात. त्यावेळी त्यांना तो गणपती पूजेला लावावाच लागतो. मग ऐनवेळी धावाधाव करून सामान, पूजासाहित्य आणावे लागते. पण हे करताना ‘मूळ घरी जाता येणार नाही’ ही हुरहूर त्यांना मनात जाचत राहते. हे वर्षानुवर्षे होते. एका मोठ्या एकत्र कुटुंबात विनाकारण फूट पडते. म्हणून असा आगांतुकपणा कुणीही करू नये. श्रीगजानन ही देवता ऐक्य साधणारी आहे. दुरावा करणारी नाही. लोक आपापसातील भांडणे, वैर, भेदभाव विसरून गणेशचतुर्थीला एकत्र येऊन गुण्या-गोविंदाने हा सण साजरा करतात. पण अशा आगंतुक वागण्याने त्याला गालबोट लागते. म्हणून गणपती कुणाकडे ठेवायचा असल्यास त्यांच्या संमतीने ठेवावा.
श्रीगणेश ही अतिप्राचीन देवता आहे. अगदी वेदकाळापासून या देवतेची उपासना आपल्याकडे चालू आहे. कोणत्याही शुभकार्यात अग्रपूजेचा मान गणेशालाच असतो. गणपती देवांचा सेनापती आहे. साहित्याचा ज्ञाता आहे. चौदा विद्या व चौसष्ट कलांचा उद्गाता आहे. आपण जी देवनागरी लिपी लिहिण्यास वापरतो तिचा निर्माता श्रीगणेश आहे.
कलियुगात गणपतीचे नाव धूम्रवर्ण असे आहे. धूम्र म्हणजे धूर. आजच्या सर्वव्यापी प्रदूषणाच्या काळात हे नाव अतिशय सार्थ आहे. गणपतीची पूजा आपण करू लागलो कारण त्याने लोकोत्तर कार्य केले. विद्येची सेवा केली. नृत्य, संगीत, नाट्य अशा कला मनोरंजनासाठी निर्माण केल्या, वाढवल्या. दुष्ट-दुर्जनांच्या निर्दालनप्रसंगी त्याने हाती शस्त्र धरले. युद्धात अंतिम विजय मिळवून देवादिकांना भयमुक्त केले. अनेक अलौकिक व कर्तृत्वशाली गुण गणपतीत एकवटलेले आहेत. माणसाच्या मनात विशुद्ध पूज्यभाव जागवणारा तोच आहे, म्हणून त्याची मनोभावे पूजा करायची.
भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव साजरा होतो. काही २१ दिवस असा दीर्घकाळ तर काही दीड दिवस असा अल्पकाळ घरात गणपती बसवतात. या दिवसांत विलोभनीय अशी फुलांची सजावट व पक्वांनांची लयलूट असते. शिवाय नयनरम्य रांगोळ्या गणेशासमोर घातल्या जातात. या काळात अनेक मनोवेधक देखावे सार्वजनिक गणेशोत्सवात पाहायला लोकांची रिघ लागते. गणेशाला २१ ही संख्या प्रिय आहे. त्याला एकवीस मोदकांचा नैवेद्य, २१ दूर्वा असलेल्या अशा एकवीस जुड्या बांधलेली माळ घालतात.
घरात गणपती बसवलेला असताना कुणीही भांडणतंटा करू नये. कठोर शब्दांनी एकमेकांना दुखवू नये, असा संकेत आहे. कारण तो शुभकार्याचा प्रतीक आहे. वाईट आचरण केल्यास त्याचा रोष होतो. फक्त चतुर्थी सणापुरतेच नाही तर नेहमीच सलोख्याने, सौहार्दाने वागावे म्हणजे श्रीगणेशाचे कायमचे वास्तव्य आपल्या घरात राहून कुटुंबात सुखशांती नांदेल.
गणेशचतुर्थी म्हणजे आनंदाचा परमावधी
गणेशचतुर्थी म्हणजे म्हणजे निसर्गाची सुगी
गणेशचतुर्थी म्हणजे मांगल्याची पर्वणी
गणेश चतुर्थी म्हणजे पावित्र्याचा शिडकावा!
गणेशोत्सव साजरा करायच्या प्रत्येक ठिकाणच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. म्हणजे मंत्र पूजापद्धती तीच पण उत्सवी वातावरण वेगळे. या सगळ्यांत गोमंतकीयांची उत्सवप्रियता उठून दिसते. गोव्यातला गणेशोत्सव म्हणजे यासम हा! दिखाऊपणा नाही की बटबटीतपणा नाही. काय वर्णू त्याची थोरवी! माटोळीची शोभा काय वर्णावी! सगळं कसं उत्तमोत्तम जमवण्याचा आटापिटा, भक्तिप्रेम ऊतू जातं प्रत्येकाचं! गणपतीसाठी मूळ घरी जाताना काय नेऊ आणि काय नको असं होऊन जातं त्याला. गणपती येणार म्हणजे प्रत्येकाला नवे कपडे हवेतच! त्यांची खरेदी होते. घरात एखादी वस्तू नसेल तर चतुर्थीच्या निमित्ताने तिचीही खरेदी होते. म्हणजे गरीब बसण्यासाठी खुर्च्या घेईल तर पैसेवाला ओव्हन किंवा तत्सम उपयुक्त वस्तू घेईल. शिवाय मिठाई, गणपतीला हार व इतर वस्तू वगैरे म्हणजे मनसोक्त खरेदी होते. स्त्रियांच्या उत्साहाला तर उधाण येतं. सर्व शक्ती एकवटत पदर खोचून त्या कामाला लागतात. त्यावेळी त्या अजिबात थकत नाहीत.
पूर्वी तर घराच्या रंगरंगोटीचे कामसुद्धा स्त्रियाच करीत.
पिवळ्या मातीने उभ्या भिंती शिडीवर उभ्या राहून सारवीत. जमिनीसुद्धा घोटून सारवून काळ्याभोर करीत. शेणात काळा रंग घालून ‘कणे’ काढीत. ‘कणे’ म्हणजे चुन्याच्या निवळीत थोडे तांदळाचे पीठ घालून त्या पांढर्या रंगाने ठिपक्यांच्या किंवा फुल्यांच्या मोठ्या रांगोळ्या काढत. दरवाजांवरसुद्धा कमानदार पट्टी काळ्या शेणाने सारवून त्यावर ‘धारी’ म्हणजे ‘किनार’ काढण्यात बहुतेक बायका पटाईत असत. वर्षभर या कलाकृती जशाच्या तशा उरत. गणपतीसाठी सुबक वाती-वस्त्रे घरातील वडीलधार्या स्त्रिया करीत. त्या काळी पंचखाद्याच्या लाह्या विकत मिळत नसत. मग या लाह्या चुलीवर मातीचे कुंद तोंडाचे मडके (खापर) ठेवून उत्तमपैकी लाह्या काढून त्या निगुतीने निवडून ठेवायच्या असत. हे कामही वृद्धमंडळी करीत. चतुर्थीत अनंत कामे असत. आताही असतात. पण गणपतीसमोर फुगड्यांचा फेर धरताना त्यांचा उत्साह शिगेला पोहोचे. गोव्यात शेती-बागायती यांचे खूप प्रमाण आहे. चतुर्थीच्या दिवसात गडीमाणसे येत नाहीत. मग आमच्या बहाद्दर स्त्रिया ते काम करायलाही मागे नसत. कशाला ‘नाही’ म्हणायचे नाही हा बाणा! कंबरेवर टोपली घेऊन सुपार्या वेचाव्यात तर या शूर बायकांनीच! तेही करून दुपारी गोडाधोडाचा स्वयंपाक करून पंगत वाढायला पदर खोचून उभ्या! हे बळ त्यांना कुठून मिळतं? गणरायाकडून त्याचा उत्सव यथासांग साजरा कसा होईल व त्यातून जास्तीत जास्त आनंद कसा लुटता येईल या ऊर्मीने त्या वावरतात. गणपती घरात येतो तो प्रचंड ऊर्जा घेऊनच. सगळे दिवसच आनंदावर आरूढ होतात. प्रत्येक आबालवृद्धाच्या मनात तो जाऊन बसतो. झोपडीपासून ते हवेलीपर्यंत सर्वच स्थाने त्याला प्रिय आहेत; म्हणूनच तो सर्वसमावेशक आहे.
आजपर्यंतच्या आयुष्यात अनेक ठिकाणचे गणेशोत्सव पाहण्यात आले. महाराष्ट्रात वाई, पुणे, महाबळेश्वर आणि गोवा. बालपणात वाईला राहण्याचा योग आला. वाई हे शहर मुळातच शांत. कुणाच्या अध्यात न मध्यात! इथे पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा होई. तो काळ ‘मेळ्यांचा’ होता. सिनेमाइतकेच मेळ्यांचे आकर्षण त्यावेळी मुलामुलींना होते. कारण त्यात सिनेमातील गाजलेली गाणी सादर होत. ‘राधा ना बोले, ना बोले, ना बोले रे!’ किंवा ‘आधा है चंद्रमा रात आधी!’ किंवा कुहू कुहू बोले कोयलिया!’ अशी रेडिओवर ऐकायला मिळणारी गाणी स्टेजवर स्थानिक गायक-गायिका म्हणत तेव्हा त्यांचे खूपच अप्रूप वाटे. अगदी जसंच्या तसं स्टेजवर माइक हातात घेऊन कसं काय धीटपणे म्हणतात असं वाटे. ती गाण्याबरहुकूम पोशाख व हावभाव करीत. ते पाहून एखादा सिनेमाच पाहत आहोत असे वाटे. काही गाणी फक्त ऐकायची असत. बाहेर गावचे पण मेळे यायचे. काही वेळा प्रसिद्ध वक्त्यांची व्याख्याने असायची. एकदा एक बालशाहीर भलताच प्रसिद्धी पावला होता. डफ स्वतः वाजवून तो अशा काही तडफेने पोवाडे गात असे की लोक भारून जात.
वाईत राहात असतानाची आणखी एक आठवण मनाला खूप आनंद देते, ती म्हणजे, आम्ही ज्या पाटणकर वाड्यात राहायला होतो तिथे वाड्यातील आम्ही मुले-मुली मिळून आमचा खास गणपती बसवत असू. या वाड्यात एक मोठा दिवाणखाना (हॉल) होता. दर्शनी भिंतीवर मोठाली तैलचित्रे लावलेली होती. एक मोठा आरसाही होता. छताला हिरव्या-लाल हंड्या लावलेल्या होत्या. झुंबर होते. खिडक्यासुद्धा महिरपीदार होत्या. मध्ये मध्ये काळे कुळकुळीत कोरलेले शिसवी खांब होते. असा त्या दिवाणखान्याचा शाही थाट होता. हा वाडा म्हणे आमच्या घरमालकांनी सरदार रास्त्यांकडून विकत घेतला होता. म्हणूनच हा थाटमाट होता. तर अशा हॉलमध्ये आम्ही मुलांचा गणपती बसवत असू. फक्त महानैवेद्य सोडला तर बाकी सर्वकाही होत असे. दोन्ही वेळेला दणक्यात आरत्या करीत असू. चांगला पाच दिवस गणपती ठेवून आम्ही हौस भागवीत होतो. प्रत्येकाने एक वेळ पूजा करायची व त्यावेळेचा प्रसाद आणायचा. आमच्या आम्हीच पूजा करीत असू. मोठी माणसे करतात ते पाहून शेवटच्या दिवशी विविध गुणदर्शन. कुणी पुस्तकातल्या पाठ केलेल्या कविता तर कुणी सीनेगीत. कुणी सिनेमातले सीन. हे पाहायला प्रत्येक बिर्हाडातले लोक कौतुकाने एकत्र जमत. आमच्यात भांडणे मात्र होत नसत हे विशेष. गणेशोत्सवाच्या अशा अनेक आठवणी आयुष्य समृद्ध करतात. गोव्यात चतुर्थीच्या निमित्ताने एकमेकांच्या घरी जाण्याची स्तुत्य रीत आहे. श्रीगणेशाच्या साक्षीने प्रेमाची व आनंदाची देवाण घेवाण होते. हाच तर सण साजरे करण्यामागचा हेतू असतो.