गणेशचतुर्थीच्या सामानाने राज्यभरातील बाजारपेठा सजल्या

0
11

>> जोरदार पावसामुळे खरेदीवर थोडा परिणाम; दुकानदार-व्यावसायिक पडले चिंतेत

राज्यभरातील गणेशभक्तांकडून विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू झाली असून, राज्यातील बाजारपेठा सजावटीच्या नाविन्यपूर्ण सामानाने सजल्या आहेत. भाविकही हळूहळू खरेदीसाठी बाजारात गर्दी करू लागले आहेत; मात्र जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे खरेदीवर परिणाम होत आहेत. त्यामुळे व्यापारी व दुकानदार काहीसे चिंतेत पडले आहेत. दुसऱ्या बाजूला चित्रशाळांमध्ये गणेशमूर्ती रंगवण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, रात्रीचा दिवस करून मूर्तीकार गणेशमूर्तींचे रंगकाम पूर्ण करण्यात गुंतले आहेत.

गणेशचतुर्थी हा राज्यातील सर्वात मोठा सण. लाडक्या बाप्पाच्या आगमनाची भाविक आतुरतेने वाट पाहत असतात. हा सण आता अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला असून, भाविक गणरायाच्या आगमनाच्या तयारीत गुंतले आहेत. घरोघरी स्वच्छता, साफसफाई, रंगकाम, सजावट, पताका लावणे, आकर्षक देखावे तयार करणे आदी कामेही सुरू झाली आहेत. आजच्या जमान्यात पूर्वीसारखी महिनाभर चालणारी घराची आकर्षक सजावट कमी झालेली असून, रेडिमेडवर लोकांचा भर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेकडो प्रकारचे रेडिमेड मखर बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत. महिला देखील गोडधोड पदार्थ तयार करण्याच्या कामाला लागल्या आहेत.

डिचोली, साखळी यासह राज्यातील सर्व बाजारपेठांतील दुकानांमध्ये वैशिष्ट्‌‍यपूर्ण पद्धतीचे हार, मखर, सजावटीचे सामान दाखल झाले असून, त्याच्या खरेदीस भाविकांनी सुरुवात केली आहे, असे येथील विनायक शिरोडकर यांनी सांगितले.
तसेच माटोळीचे सामान गोळा करून ते बाजारात आणण्यासाठी कष्टकरी लोक सज्ज झाले आहेत. त्यांनी डोंगरमाथ्यावर वेगवेगळ्या ठिकाणी माटोळीचे सामान हेरून ठेवले असून, चतुर्थीला चार दिवस असताना हे माटोळीचे सर्व सामान बाजारपेठेत दाखल होणार आहेे, असे फटो गावकर यांनी सांगितले. लाकडी पाट, माटोळी, चौरंग आदी समान तयार केले असून, उत्तम प्रकारे कोरीव केलेले सामान विक्रीसाठी उपलब्ध केल्याचे आनंद नार्वेकर यांनी सांगितले.

खरेदीच्या उत्साहावर पाऊस फेरतोय पाणी

सप्टेंबर महिना सुरू झालेला असताना आता पावसाचा जोर कमी व्हायचा सोडून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस राज्यात कोसळू लागला असून, काल मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढले. त्यामुळे गणेशचतुर्थीच्या खरेदीवरही परिणाम होऊ लागला आहे. पणजी शहरात भरलेल्या अष्टमीच्या फेरीवर यंदा जोरदार पावसामुळे परिणाम झाला आहे. हवामान खात्याने आठवडाभर पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे. त्यामुळे गणेशचतुर्थी उत्सवावरही परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 4 ते 7 सप्टेंबरपर्यंत जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. ‘वाईडस्प्रेड मान्सून’ची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असून, राज्यात सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे म्हटले आहे. सध्या अरबी समुद्रावर पावसाचे ढग दाटून आलेले असून, राज्यात पावसासाठी पोषक हवामान निर्माण झालेले आहे. आतापर्यंत राज्यात 156 इंच एवढा विक्रमी पाऊस पडला आहे.
काल सोमवारी राजधानी पणजी, मडगाव तसेच अन्य विविध शहरे व गावात मुसळधार पाऊस कोसळल्याने शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले.