एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि अपेक्षा सोबत घेऊन आणि आपल्या बाहूंवर भारताचा तिरंगा मिरवीत भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला काल ॲक्झिम – 4 मोहिमेंतर्गत अमेरिकेतील फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून अंतराळात झेपावले. नील आर्मस्ट्राँगने 1969 साली जेथून अपोलो 11 अंतराळयानातून चंद्रावर झेप घेतली होती, नेमक्या त्याच ठिकाणावरून शुभांशू आणि सहकाऱ्यांना घेऊन जाणारे अंतराळयान काल दुपारी निघाले. 1984 साली तीन एप्रिलला विंग कमांडर राकेश शर्मा यांनी अंतराळात पाऊल ठेवणारा पहिला भारतीय होण्याचा मान मिळवला होता, त्यानंतर तब्बल 41 वर्षांनी एका भारतीयाने अंतराळात हे दमदार पाऊल ठेवले आहे. राकेश शर्मा हे सोयूझ टी – 11 ह्या रशियन अंतराळयानातून अंतराळात गेले होते आणि त्यांनी तत्कालीन साल्यूत 7 अंतराळस्थानकावर सात दिवस मुक्काम केला होता. शुभांशू शुक्ला हे स्पेस एक्सच्या फाल्कन 9 प्रक्षेपकाच्या मदतीने क्रू ड्रॅगन सी 213 अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकाकडे निघाले आहेत. ही खासगी अंतराळमोहीम जरी असली तरी भारताच्या भावी ‘गगनयान’च्या उद्दिष्टाच्या पूर्ततेच्या दिशेने टाकले गेलेले हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. म्हणूनच भारत सरकारने ह्या मोहिमेत इतर देशांसोबत आपल्या अंतराळवीराला पाठवण्यासाठी तब्बल पाचशे पन्नास कोटी मोजले आहेत. नासाच्या अंतराळवीर पेगी व्हिटसन ह्या ह्या मोहिमेच्या मिशन कमांडर आहेत. आपले शुभांशू शुक्ला मिशन पायलट आहेत आणि हंगेरीचे तिबोट कापू आणि पोलंडचे स्लावोस्झ उझवान्स्की विसनीव्हस्की यांचाही ह्या मोहिमेत सहभाग आहे. ह्या आपल्या मोहिमेत हे अंतराळवीर 31 देशांसाठी जवळजवळ साठ शास्त्रीय प्रयोग करणार आहेत, ज्यामध्ये भारताच्या सात महत्त्वपूर्ण प्रयोगांचा समावेश आहे. भारताच्या भावी ‘गगनयान’ मोहिमेसंदर्भात सूक्ष्मगुरुत्वाकर्षणाच्या संदर्भातील आणि इतर बाबतींतील हे महत्त्वपूर्ण शास्त्रीय प्रयोग आहेत, ज्याचा आपल्या आगामी मोहिमेत फायदा मिळेल. भारताचे ‘गगनयान’ जेव्हा चंद्राच्या दिशेने निघेल तेव्हा शुभांशू हेही त्यात असणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी देखील ही मोहीम व्यक्तिशः समृद्ध अनुभव देणारी ठरेल यात शंका नाही. ॲक्झिम 4 मोहिमेमध्ये गेले काही दिवस आलेल्या अनंत अडचणींमुळे कालच्या उड्डाणाबाबत चिंतेचे वातावरण असणे स्वाभाविक होते. खरे तर ही मोहीम गेल्या महिन्यात 29 मेला निघणार होती. परंतु त्यानंतर सातत्याने काही ना काही तांत्रिक अडचणी येत गेल्या आणि ही मोहीम 8 जून, 10 जून, 11, 19, 22 जून असे करीत करीत शेवटी 25 जून ह्या तारखेवर येऊन स्थिरावली. काल सकाळी उड्डाणाआधी देखील त्यामध्ये काही तांत्रिक दोष आढळला होता, परंतु आता मोहीम रद्द करावी लागणार असे वाटत असताना केवळ साठ सेकंद अगोदर तो दोष दूर करण्यात यश मिळाले आणि ठरल्याबरहुकूम हे अंतराळयान निघाले. आपल्या अंतराळयानामध्ये द्रवरूप प्राणवायूची गळती झाली आहे, जेथे आपण चाललो आहोत त्या जुनाट झालेल्या आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकावर देखील तांत्रिक बिघाड होत आहेत हे सगळे दिसत असूनही ज्या धैर्याने शुभांशू आणि त्यांचे सहकारी ह्या मोहिमेवर निघाले ते धाडस खरोखर कौतुकास्पद आहे. शुभांशू पंधरा वर्षे लढाऊ विमानांचे वैमानिक राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्यात ती लढाऊ वृत्ती आहेच, परंतु आपण ज्या मोहिमेचा भाग आहोत ती जशी यशस्वी होऊ शकते, तसेच अपयशही पदरी पडू शकते आणि कल्पना चावलांच्या बाबतीत जे घडले तसे काही अत्यंत विपरीत झाले तर आपले काय होईल ह्याची कल्पनाही जेथे थरकाप उडविते अशावेळी शांतचित्ताने आपल्या देशासाठी असे आव्हान स्वीकारणे ही खरोखर अतुलनीय अशी गोष्ट म्हणावी लागेल. शुभांशूचे आईवडील चिंतित अंतःकरणाने आणि साश्रू नयनांनी उड्डाणाच्या त्या ऐतिहासिक क्षणाचे प्रत्यक्ष साक्षीदार बनले होतेच, परंतु त्यांच्या भावभावनांशी देशभरातील लाखो लोक एकरूप झालेले होते. आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावरील आपली मोहीम आटोपून त्यांचे पाय कधी एकदा भूतलावर सुखरूप लागतात ह्याची आता संपूर्ण देशाला प्रतीक्षा आहे. हजारो शालेय विद्यार्थ्यांनी कालच्या मोहिमेचे प्रत्यक्ष दर्शन श्वास रोखून घेतले. शुभांशूंचे अंतराळयान एकेक टप्पा पार करताना काळजाचा ठोका चुकत होता. राकेश शर्मा यांच्या अंतराळमोहिमेविषयी वाचत वाचत मोठे झालेल्या शुभांशू शुक्लांनी त्यांचा आदर्श जसा डोळ्यांसमोर ठेवला, तशाच प्रकारे शुभांशू यांचा आदर्श ठेवून शेकडो मुले विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये पुढे येतील आणि भारताच्या अंतराळसंशोधन क्षेत्रातील प्रगतीला कळसावर नेतील यात मुळीच संदेह नाही.