गंभीर धमकी

0
11

भारतीय विमान कंपन्यांच्या विमानोड्डाणांमध्ये बाधा उत्पन्न करण्यासाठी गेले काही दिवस सातत्याने विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. समाजमाध्यमांचा वापर करून दिल्या जाणाऱ्या ह्या धमक्यांचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांनी चालवला असला तरी त्यात आजवर अपयशच आले आहे. मध्यंतरी छत्तीसगढच्या एका अल्पवयीन मुलाला अशाच एका धमकी प्रकरणात अटक करण्यात आली, परंतु त्यानंतर देखील ह्या धमक्यांचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी भारतातील रेलगाड्यांच्या मार्गांवर अडथळे उभे करून रेल दुर्घटना घडविण्याचे प्रयत्न ठिकठिकाणी चालले होते. परंतु सुदैवाने मोठी रेलदुर्घटना घडली नाही. आता विमान वाहतुकीसंदर्भात हे जे काही चालले आहे, त्यामागे नेमके कोण आहे हे शोधण्याचे मोठे आव्हान तपास यंत्रणांपुढे आहे. आधीच तोट्यात असलेल्या विमान वाहतूक व्यवसायाला ह्या धमक्यांमुळे अतोनात नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. एखादे विमान नियोजित ठिकाणापेक्षा अगदी वेगळ्या ठिकाणी वळवावे लागल्याने होणारा इंधनावरील खर्च, प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यावर होणारा खर्च ह्या सगळ्यावर विमान कंपन्यांना अतोनात खर्च करावा लागत आहे. त्याशिवाय खुद्द विमान प्रवाशांना सोसाव्या लागणाऱ्या अडचणी तर खूपच गंभीर स्वरूपाच्या ठरत आहेत. एखाद्या ठिकाणी जायचे असताना अचानक ते विमान अन्यत्र वळवले जाणे किंवा बॉम्बच्या शोधासाठी विमानतळावरील ‘आयसोलेशन बे’ ला हलवल्याने विमानोड्डाणास विलंब होणे ह्यामुळे प्रवाशांचा बहुमोल वेळ वाया जातो. महत्त्वाच्या आणि तातडीच्या व्यावसायिक कामासाठी नित्यनेमाने विमान प्रवास करणारे असंख्य प्रवासी असतात. त्यांच्या प्रवासाचे वेळापत्रक कोलमडल्याने त्यांना आणि त्यांच्या कंपन्यांना सोसावे लागणारे नुकसान हे तर वेगळेच. विमान कंपन्यांना बॉम्ब असल्याच्या धमक्या दिल्यावर हवाई वाहतुकीच्या नियमावलीप्रमाणे सारे सोपस्कार वैमानिकांना पार पाडावेच लागतात. विमान हवेत असेल तर जवळच्या सुरक्षित ठिकाणी तातडीने उतरवावे लागते. विमानतळावर उड्डाणाच्या प्रतीक्षेत असेल, तर विमानतळावरच सुरक्षित ठिकाणी नेऊन त्याची संपूर्ण तपासणी करावी लागते. सातत्याने ‘लांडगा आला रे आला’ प्रमाणे ह्या धमक्या दिल्या जात असल्याने विमान कंपन्या कोणताही धोका पत्करू शकत नाहीत. त्यांना प्रत्येक धमकी गांभीर्यानेच घ्यावी लागते. गेल्या काही दिवसांत पंच्याहत्तरहून अधिक विमानांना एक तर अन्यत्र वळवावे लागले आहे किंवा त्यांचे उड्डाण लांबणीवर टाकावे लागले आहे. आता ह्या अशा प्रकारच्या धमक्या देणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावणारी कायदेशीर तरतूद करण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. कायदा कठोर करणे ठीक आहे, परंतु जे गुन्हेगार आहेत, त्यांच्यापर्यंतच पोहोचता येणार नसेल तर नुसता कायदा कडक करून फायदा काय? ह्या दिल्या जाणाऱ्या धमक्या व्हीपीएन नेटवर्क चेनिंगद्वारे दिल्या जात असल्याचा संशय आहे. त्यामुळे ज्या संगणकावरून ही धमकी दिली जाते, त्याचा आयपी ॲड्रेस मिळवणे दुरापास्त होऊन बसते. हे धमकी देणारे भारतातच असतील असे नाही, भारताच्या कायद्याच्या कक्षेच्या बाहेर दूर कुठेतरी परदेशांत असू शकतील. त्यामुळे त्यांचा नेमका ठावठिकाणा मिळवणे अवघड बनलेले आहे आणि ह्याचाच फायदा हे समाजकंटक उठवीत आहेत असे दिसते. गेले काही दिवस विमानोड्डाणांना मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर कुख्यात खलिस्तानवादी दहशतवादी गुरुपतवंतसिंग पन्नूनने येत्या नोव्हेंबरमध्ये एअर इंडियाच्या विमानांतून प्रवास करू नका, शिखांच्या हत्याकांडाच्या स्मृतिदिनानिमित्त विमान उडवून दिले जाईल अशी जाहीर धमकी दिली आहे. खरे तर आता एअर इंडिया ही सरकारी विमान कंपनी राहिलेली नाही. ती टाटांच्या मालकीची झाली आहे. शिखांवर अत्याचार ज्या पक्षाच्या सरकारच्या सत्ताकाळात झाले, तो पक्षही केंद्रात किंवा पंजाबात आता सत्तेवर नाही. असे असताना विमान उडवण्याची आणि एअर इंडियाला लक्ष्य करण्याची धमकी देण्याचा हा प्रकार अजबच म्हणायला हवा. हा पन्नून अमेरिकेचे आणि कॅनडाचे नागरिकत्व घेऊन दूर विदेशात लपला आहे. भारताने त्याला दहशतवादी घोषित करून कितीतरी वर्षे झाली, परंतु अशा प्रकारची जाहीर धमकी तो देत असताना अमेरिका आणि कॅनडा सरकार त्याची पाठराखण कशी काय करू शकते? विमान उडविण्याची ही धमकी अतिशय गांभीर्याने घेतली पाहिजे आणि भारत सरकारने त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी सर्वोच्च पातळीवरून आणि आपले सर्व वजन वापरून प्रयत्न केले पाहिजेत. भारताचे हात दूरपर्यंत पोहोचू शकतात हा संदेश जगात गेला, तरच विमान वाहतुकीमागे लागलेले हे शुक्लकाष्ठ थांबेल.