गंगेत स्नान केल्याने गरिबी दूर होणार का? : मल्लिकार्जुन खग

0
5

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये गंगेत स्नान करणाऱ्या भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाकुंभ मेळ्यात गंगा नदीत स्नान केले होते. या पार्श्वभूमीवर टीका करताना खर्गे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद पेटला आहे.

खर्गे हे मध्य प्रदेशमधील महू येथे ‘जय बापू, जय भीम, जय संविधान रॅली’मध्ये बोलत होते. अरे भाई, गंगेत डुबकी घेतल्याने गरिबी दूर होते का? तुम्हाला पोटासाठी अन्न मिळते का? असा सवाल खर्गे यांनी या सभेला संबोधित करताना केला. या विधानानंतर ताबडतोब त्यांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी आपल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल माफी मागतो, असे खर्गे म्हणाले.
जोपर्यंत टीव्हीवर व्यवस्थित दिसत नाहीत, तोपर्यंत ते (भाजप नेते) डुबकी घेत राहतात. मोदी-शाह यांनी एकत्र इतकी पापे केली आहेत की ते पुढील 100 जन्म घेतले तरी ते स्वर्गात जाणार नाहीत, अशी टीकाही खर्गे
यांनी केली.

भाजपाचे जोरदार प्रत्युत्तर
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या ह्या वक्तव्यावरून भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. महाकुंभ कोट्यवधी वर्षांपासून सनातन आस्थेचे प्रतीक राहिले आहे. काँग्रेस पक्ष आणि त्यांचे अध्यक्ष त्याची टिंगल करत आहेत. महाकुंभ स्नानाबद्दल खर्गे यांनी केलेले विधान अत्यंत लज्जास्पद आहे. इफ्तार पार्टी आणि हज यात्रेबद्दलही काँग्रेस पक्ष असे लाजिरवाणे विधान करू शकतो का? असा सवाल भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला.