मिकी पाशेको यांची मंत्रीपदी नियुक्ती करण्यामागे ख्रिश्चन समाजामध्ये विभाजन करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप करून निवडणुकीच्या काळात पाशेको यांनी चर्चच्या विरोधात टीका केली होती, त्यामुळेच त्यांना भाजपने मंत्रीपदाचे बक्षीस दिल्याचा आरोप प्रदेश राष्ट्रवादीचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी काल पत्रकार परिषदेत केला. कॉंग्रेस आमदार माविन गुदिन्हो कॉंग्रेसवरच टीका करीत आहेत. ते चर्च विरोधी भाष्य करीत नाहीत. त्यामुळे भाजप त्यांना जवळ करण्यास तयार नाही, असे डिमेलो यांनी सांगितले. गोव्यातील नौदलाचा तळ कारवारला हलविण्याची मागणी करणे ही राष्ट्रविरोधी कृती होईल, या संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या विधानास राष्ट्रवादीने हरकत घेतली आहे. दाबोळी येथील नौदलाचा तळ कारवार येथे हलविण्याची मागणी माथानी साल्ढाणा यांची होती. साल्ढाणा राष्ट्रविरोधी होते काय, असा प्रश्न डिमेलो यांनी केला. संरक्षणमंत्र्यांनी आपले हे विधान मागे घ्यावे किंवा दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांच्या इमारतीला दिलेले साल्ढाणा यांचे नाव काढून टाकावे, अशी मागणी डिमेलो यांनी केली आहे.