>> 4-5 वर्षांपूर्वी होता अवघा 500 रुपये प्रति किलो दर; गोव्यासह महाराष्ट्र-कर्नाटकातही वाढती मागणी
आगळ्यावेगळ्या अशा स्वादामुळे अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या व गोव्याबरोबरच आता देश-विदेशांतही पोचलेल्या खोल (ता. काणकोण) ह्या गावातील मिरचीचा भाव आता दिवसागणिक वाढतच चालला असून, चार-पाच वर्षांपूर्वी किलोमागे 500 रुपयांपर्यंत भाव असलेल्या या मिरचीचे दर आता किलोमागे तब्बल 1800 रुपये एवढे वाढले आहेत.
खोल हे काणकोण तालुक्यातील एक गाव आहे, तेथे पीक घेतल्या जाणाऱ्या या मिरचीला खूप मागणी असून, जानेवारी 2020 साली ह्या मिरचीला जीआय टॅग म्हणजेच भौगोलिक मानांकन प्राप्त झालेले आहे. ही मिरची जेवणाची रुच वाढवत असल्यामुळे या मिरचीला गोव्याबरोबरच महाराष्ट्र, कर्नाटक व अन्य राज्यांतही मागणी आहे. परिणामी खोलच्या मिरचीचे दर आता वाढून 1800 रुपयांवर पोचले आहेत.
काणकोण-खोल येथील डोंगराळ भागात पिकणारी ही लाल रंगाची मिरची ही जास्त तिखट नसली, तरी आकाराने लांब असलेल्या या मिरचीचा खमंग हा खवय्यांना आवडणारा असा आहे. आंब्याचे लोणचे, चटणी याबरोबरच ‘फिश करी’साठी या मिरचीचा वापर केला जात असल्याने या मिरचीला बाजारात भरपूर मागणी आहे. प्रामुख्याने गोव्यातील अनुसूचित जमातींतील शेतकरी या मिरचीची लागवड करीत असतात.
‘द प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हराईटीज अँड फार्मर्स राईट्स ऑथॉरिटी’ने या मिरचीच्या झाडाची गोव्यातील फर्स्ट फार्मर प्लांट व्हराईटी म्हणून नोंदणी केलेली आहे. काणकोण परिसरातील अनुसूचित जमातींतील शेतकरी सोडल्यास अन्य कुठल्याही शेतकऱ्यांना 2039 सालापर्यंत या मिरचीची व्यावसायिक कारणासाठी लागवड करता येणार नसल्याचेही शेतकरी हक्क प्राधिकरणाने यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे.
2039 पर्यंत अन्य कोणालाही लागवडीस मनाई
पर्यटन स्थळ असलेल्या गोव्यात दिवसागणिक या मिरचीची मागणी वाढतच चाललेली असल्याने या मिरचीचा भाव आता 2 हजार रुपयांच्या जवळ पोचला असून, पुढील काही वर्षांत तो 2500 रुपयांवर पोचण्याची शक्यता खोलच्या मिरचीचे पीक घेणाऱ्या आदिवासी जमातींतील शेतकऱ्यांनी दै. ‘नवप्रभा’शी बोलताना व्यक्त केली. स्वादाच्याबाबतीत आमच्या मिरची ही नंबर वन असून, या मिरचीशी कुठल्याही मिरचीची तुलना घेऊ शकत नसल्याचे मतही या शेतकऱ्यांनी व्यक्त केले.