>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती
केंद्र सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलले असून आता हा पुरस्कार यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाणार आहे. मेजर ध्यानचंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करतानाचा फोटो ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली. खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचे नाव दिले जावे यासाठी आपल्या देशभरातून लोकांच्या विनंत्या येत होत्या असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार त्यांच्या नावे देणे योग्य असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी, ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या अतुलनीय प्रयत्नांमुळे आपण सर्व भारावून गेलो आहोत. विशेषतः हॉकीमध्ये आमच्या मुला -मुलींनी दाखवलेली इच्छाशक्ती, विजयाच्या दिशेने दाखवलेली जिद्द वर्तमान आणि भावी पिढीसाठी एक मोठी प्रेरणा असल्याचे सांगत ऑलिम्पिकमधील खेळाडूंचे कौतुक केले.
१९९१-१९९२ मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात झाली. हा पुरस्कार प्रथम बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याला देण्यात आला. त्यानंतर आतापर्यंत लिअँडर पेस, सचिन तेंडुलकर, धनराज पिल्ले, पुलेला गोपिचंद, अभिनव बिंद्रा, अंजू बॉबी जॉर्ज, मेरी कोम आणि राणी रामपाल यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
मोदींनी हे नाव बदलण्यामागील कारणाचाही खुलासाही करताना, मेजर ध्यानचंद हे भारतातील आघाडीचे खेळाडू होते. त्यांनी देशाला भरपूर मान मिळवून दिला. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद यांचे नाव देणे योग्य ठरेल, असे म्हटले आहे.