‘आजचा अमुचा पराभव पचवतो आम्ही उद्यास्तव, विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही’ असे म्हणत भारताची ‘इस्रो’ आपल्या ‘चांद्रयान – 3′ मोहिमेसाठी पुन्हा एकवार सिद्ध झाली. चार वर्षांपूर्वी चांद्रयान – 2 अगदी चंद्रावर उतरण्याच्या बेतात असताना वेग आवरता न आल्याने त्याच्या पृष्ठभागावर आदळून ‘इस्रो’च्या त्या मोहिमेचा आणि कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नांचाही चक्काचूर झाला होता. आता पुन्हा एकदा नव्या दमाने आणि पूर्ण तयारीनिशी ते उड्डाणास सिद्ध झाले आहे. नियोजनाबरहुकूम सारे पार पडले तर येत्या 14 जुलै रोजी दुपारी अडीच वाजता ते अवकाशात झेपावेल आणि 23-24 ऑगस्टला प्रत्यक्ष चंद्रावर उतरेल. चार वर्षांपूर्वीच्या अपयशाने खचून न जाता आपल्या शास्त्रज्ञांनी त्या बिघाडाच्या कारणांचा गेली चार वर्षे कसून शोध घेतला. त्यासाठी त्या मोहिमेतील क्षणन्क्षणाच्या नोंदींचे सखोल विश्लेषण करण्यात आले. त्यातून त्यांना मागच्या मोहिमेत नेमके काय घडले ते स्पष्ट झाले. ‘इस्रो’चे प्रमुख कैलासवडिपु सिवन यांनी एका मुलाखतीत नुकतीच ही माहिती दिली आहे. एखाद्या ग्रहावर यान उतरते, तेव्हा त्याचे चार टप्पे असतात. पहिला टप्पा, ज्याला ‘रफ ब्रेकिंग’ म्हणतात, त्यात यानाचा वेग नियंत्रित केला जातो. दुसऱ्या टप्प्यात ग्रहापासूनची उंची नियंत्रित केली जाते. तिसरा निर्णायक टप्पा ‘फाईन ब्रेकिंग’चा असतो, ज्यामुळे यान हलकेच ग्रहावर उतरते. परंतु ‘चांद्रयान – 2′ च्या बाबतीत ते उतरत असताना वरील पहिला टप्पा तर व्यवस्थित पार पडला, पण दुसऱ्या टप्प्यातच लक्षात आले की यानाच्या काही भागात त्याच्या प्रॉपल्शन सिस्टममध्ये दोष आहे. त्यामुळे यान नियंत्रित करणारी सॉफ्टवेअर प्रणाली तो ताण हाताळू शकली नाही आणि जमिनीवरील नियंत्रण कक्षातील हाताळणीलाही मर्यादा आल्या. त्यामुळे वेग नियंत्रित करता न आल्याने चांद्रयानाचे लँडर चंद्राच्या पृष्ठभागाला प्रचंड वेगाने धडकून नष्ट झाले. मात्र, तत्पूर्वी त्या यानाचा चंद्राच्या परिभ्रमणकक्षेत उतरवला गेलेला भाग, ज्याला ऑर्बिटर म्हणतात, तो मात्र व्यवस्थित उतरवला गेला होता व तो चंद्राच्या परिभ्रमणासंदर्भातील माहिती यशस्वीपणे पृथ्वीवर पाठवत राहिल. मात्र, प्रत्यक्ष पृष्ठभागावर ते ‘विक्रम’ लँडर उतरवणे आणि त्यातील ‘प्रग्यान’ या रोव्हरद्वारे करायचे असलेले विविध प्रयोग करता आल्याने शास्त्रज्ञांची घोर निराशा झाली होती. आपल्याला आठवत असेल, निराश झालेल्या त्या शास्त्रज्ञांना भेटायला पंतप्रधान मोदी गेले होते आणि भावनाविव्हळ झालेल्या सिवन यांना त्यांनी मिठीत घेत थोपटले होते. ‘मी तुमच्या सांत्वनासाठी नव्हे, तर तुमच्यापासून प्रेरणा घ्यायला आलो होतो’ असेही मोदी तेव्हा उद्गारले होते. अपयश ही यशाची पहिली पायरी असते म्हणतात. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी हिंमत न हारता गेल्यावेळचे दोष लक्षात घेऊन या यानामध्ये आवश्यक ते सर्व बदल केलेले आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा देश या मोहिमेकडे डोळे लावून बसला आहे.
भारतासारख्या विकसनशील देशाला अशा मोहिमा परवडणाऱ्या आहेत का असा एक रडका सूर नेहमी लावला जातो, परंतु गेल्यावेळच्या मोहिमेचा खर्च तर तेव्हा प्रदर्शित झालेल्या ‘ॲव्हेंजर्स एंडगेम’ या हॉलिवूडपटाहूनही कमी आला होता. चंद्राच्या पृष्ठभागावर आजतागायत फक्त अमेरिका, रशिया आणि चीन या तीनच देशांनी आपली याने उतरवलेली आहेत. त्यामुळे भारताची ही मोहीम सफल झाली तर तो चौथ्या स्थानी येईल. भारतीय अवकाश संशोधनातील गरुडभरारीची आज जगभरात प्रशंसा होत असते. त्याकडे आदराने बघितले जाते. त्यामुळे चांद्रयान मोहिमेचे यशही भारताच्या प्रतिष्ठेमध्ये चार चाँद लावून गेल्याशिवाय राहणार नाही. पंधरा वर्षांपूर्वी भारताने चंद्रावरील आपली पहिली मोहीम यशस्वी केली. त्यात त्याच्या पृष्ठभागावर कधीकाळी पाणी होते अशी माहिती मिळाली होती. यावेळी जर ‘चांद्रयान -3′ प्रत्यक्ष चंद्रावर उतरू शकले, तर आजवर केवळ मुलांच्या गोष्टीत मामा होऊन राहिलेल्या चांदोबाची उत्पत्ती कशी झाली, तो कसा उत्क्रांत होत आहे, त्याच्या पृष्ठभागावर नेमके काय आहे, तिथले खडक, तिथली माती, तिथली खनिजे या सगळ्याचे रासायनिक पृथक्करण करून इत्यंभूत माहिती आपल्याला त्याद्वारे मिळवता येऊ शकेल. आपल्या वैज्ञानिकांना जर आपण देशात वाव दिला नाही, तर ते परदेशात जाऊन त्यांच्यासाठी सेवा देतील. त्यामुळे विकसित देशांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहायचे असेल, तर या बुद्धिमत्तेला वावही मिळायलाच हवा. हजारो शास्त्रज्ञांची अविरत मेहनत यात पणाला लागलेली आहे. ‘चांद्रयान – 2′ अपयशी ठरले तेव्हा आम्ही म्हटले होते, ‘इन्ही गमकी घटाओंसे, खुशीका चाँद निकलेगा । अंधेरी रातके पर्दे में दिनकी रौशनी भी है’ आता तो रौशनीचा म्हणजे प्रकाशाचा दिवस जवळ येत चालला आहे.