खुशदिल शाहला दुखापत

0
141

पाकिस्तानचा अष्टपैलू खुशदिल शाह याला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला अंगठा फ्रॅक्चर झाल्यामुळे मुकावे लागणार आहे. शनिवारी नेटस्‌मध्ये सराव करताना खुशदिल याला ही दुखापत झाल्याचे पीसीबीने जाहीर केले.

खुशदिल याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी लागणार असला तरी पुढील आठवड्याच्या अखेरपर्यंत त्याला सराव सुरू करता येणार असल्याचे संघाचे फिजिशियन व फिजियोथेरपिस्ट यांनी सांगितले आहे. सध्या सुरू असलेल्या आंतरसंघीय सामन्याचा तो भाग नाही. तसेच २४ ते २७ या कालावधीत होणार्‍या चार दिवसीय सामन्यातही तो खेळणार नाही.

खुशदील हा आपल्या आक्रमकतेसाठी ओळखला जातो. त्याला प्रामुख्याने टी-ट्वेंटीसाठी निवडण्यात आले आहे. खुशदील याने मागील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकमेव टी-ट्वेंटी सामना खेळला आहे. यंदाच्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये त्याने मुलतान सुल्तान्सकडून खेळताना लाहोर कलंदर्सविरुद्ध २९ चेंडूंत ७० धावांच्या खेळीमुळे त्याला पाकिस्तान संघात निवडण्यात आले आहे. पाकिस्तान व इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ५ ऑगस्टपासून ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळविला जाणार आहे. मालिकेतील उर्वरित दोन्ही कसोटी साऊथहॅम्पटन येथे होतील.