खुलेआम पलायन

0
6

गोव्यातील कोट्यवधींच्या जमीन घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान हा पोलीस कोठडीतून खुलेआम पळून जातो आणि त्याला त्यासाठी खुद्द एक पोलीस शिपाईच मदत करतो ही घटना अतिशय धक्कादायक तर आहेच, परंतु गोवा पोलीस दलाची आत्यंतिक अप्रतिष्ठा करणारीही आहे. गोवा राखीव पोलीस दलातील एक शिपाईच सीसीटीव्हींची बिल्कूल पर्वा न करता अपरात्री येऊन गुन्हेगाराच्या कोठडीचे कुलूप काढतो, त्याला पळून जायला नुसती मदतच करतो असे नव्हे, तर त्या सिद्दिकीला आपल्याच मोटारसायकलवर बसवतो आणि राजरोस राज्याच्या सीमा ओलांडून कर्नाटकातील त्याच्या गावी घेऊन जातो हा सारा काय प्रकार आहे? असे कोणते आमीष ह्या पोलीस शिपायाला दाखवले गेले होते, असे कोणी कोणते अभय दिलेले होते की त्याने आपल्या नोकरीवर पाणी सोडून ह्या गुन्हेगाराची अशी खुलेआम मदत करावी? की ह्या शिपायाला हे कृत्य करण्यास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीच सांगितले होते? कोण्या राजकारण्याने त्याला त्याच्यावर काही कारवाई होणार नाही अशी ग्वाही दिलेली होती काय? जनतेच्या मनात असे असंख्य प्रश्न ह्या घटनेने उभे केले आहेत आणि गोवा पोलिसांचा पूर्वेतिहास लक्षात घेता, ह्यापैकी कोणतेही कारण ह्या पलायनाच्या घटनेमागे असले, तरीही जनतेला त्याचे आश्चर्य वाटणार नाही. येथे खुद्द सर्वोच्च पोलीस अधिकाऱ्यानेच आपल्या मित्राच्या मालमत्तेतील घर खाली करवून घेण्यासाठी आपल्या पोलीस बळाचा आणि अधिकारपदाचा गैरवापर कसा केला होता, हे आपण यापूर्वी पाहिले आहे. अमली पदार्थ व्यवहारातील बड्या गुन्हेगारांशी पोलिसांचीच कशी हातमिळवणी चालायची आणि मालखान्यातील अमली पदार्थ कसे परस्पर विकले जायचे, तेही आपण पाहिले आहे. कुख्यात घरफोड्याशी पोलिसाचीच भागिदारी असल्याचेही आपण अनुभवले आहे, नोकरी घोटाळ्यात सामील असलेले पोलीस पाहिले आहेत, खुद्द पोलीस जीपमध्ये महिलेचा विनयभंग झाल्याचे ऐकले आहे. अशी एकेक घटना घडते, तेव्हा गोवा पोलीस दलाची सगळी प्रतिष्ठा आणि दरारा मातीमोल करून जात असते, परंतु पैसा आणि संपत्तीला चटावलेल्यांचे नीतीमत्तेशी देणेघेणे उरले आहे कोठे? अनेक प्रामाणिक अधिकाऱ्यांनी आपली हयात ह्या पोलीस दलामध्ये घालवली आहे. इमानेइतबारे रात्रंदिवस जनतेची सेवा केली आहे. जनतेच्या आदरासही ते पात्र झाले आहेत. परंतु अशा लोकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली दिसते आणि याउलट अर्थपूर्ण मार्गांनी आणि मंत्र्यासंत्र्यांच्या कृपेने पोलिसांत भरती झालेले आणि हप्त्यांना चटावलेले, वर्दीची गुर्मी दाखवणारे महाभाग मोठ्या प्रमाणावर दिसू लागले आहेत. गुन्हेगारांच्या टोळ्या असाव्यात, तशा विशिष्ट अधिकारी आणि हाताखालील कर्मचारी यांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत आणि त्यांना हात लावण्यास वरिष्ठ अधिकारीही धजावत नाहीत अशी स्थिती आहे.
प्रस्तुत प्रकरणात एक नव्हे, दोन नव्हे, ज्याची किमान सहा ते सात जमीन हडप प्रकरणे उजेडात आलेली आहेत, अशा सूत्रधाराच्या मदतीसाठी एक पोलीस शिपाईच ज्या प्रकारे धावून जातो, ते पाहिल्यास त्यामागील कारणांचा शोध कसोशीने घेण्याची जरूरी निर्माण झाली आहे. असे कोणते आमीष ह्या शिपायाला दाखवले गेले की त्याला कोठडीबाहेर लावलेल्या आणि गोवा ते हुबळी मार्गावर जागोजागी असलेल्या सीसीटीव्हींचीही पर्वा करावीशी वाटली नाही? आपला हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे आणि ह्या कृत्याचा परिणाम म्हणून आपली सेवेतून बडतर्फी अटळ आहे हे ठाऊक असून देखील हे कृत्य करण्यास हा पोलीस शिपाई कसा काय तयार झाला? त्याला त्यासाठी कोणी प्रोत्साहित केले? एखाद्या राजकारण्याच्या ग्वाहीमुळे तो हे कृत्य करण्यास धजावला का? जनतेच्या मनातील ह्या अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळणे जरूरी आहे. राज्य पोलिसांची जी अप्रतिष्ठा ह्या प्रकरणात झालेली आहे त्याचे काय? गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांसाठी देखील झालेला प्रकार मानहानीकारक आहे. ह्यापूर्वी तुरुंगातून अनेक कैदी पळाले. काही उपचाराला जाताना बंदोबस्तावरील पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाले, काही इस्पितळातून गायब झाले, काही कोठडीतून पळाले, पण खुद्द पोलीस कर्मचाऱ्याच्याच मदतीने आणि त्याच्याच मोटारसायकलवरून एवढ्या खुलेआम पलायनाचा हा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे आणि म्हणूनच ह्या निर्ढावलेपणाची कमाल वाटते. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे ह्या सगळ्या पलायनाचा व्हिडिओ पोलीस तपासाचा भाग असताना थेट समाजमाध्यमांवरही पोहोचला. ह्या सगळ्या घटनेची जबाबदारी सरकारला आता घ्यावी लागेल आणि भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत हा विश्वासही जनतेला द्यावा लागेल.