खुनास कारणीभूत ‘त्या’ शॅकवर हातोडा पडणार; शॅकमालकाला 25 लाखांचा दंड

0
2

पर्यटन खात्याचा आदेश

अमर बांदेकरच्या खुनामुळे चर्चेत आलेला आणि वादग्रस्त ठरलेला हरमल समुद्रकिनाऱ्यावरील मान्युएल फर्नांडिस याचा सी लाऊंज बीच शॅक पाडून टाकण्याचा आदेश पर्यटन खात्याने दिला आहे. मान्युएल फर्नांडिस याला मंजूर केलेला शॅक त्याने हिमाचल प्रदेशमधील एका व्यावसायिकाला तो चालवण्यास दिल्याबद्दल त्याला 25 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

सदर शॅकवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 26 जानेवारी रोजी किनाऱ्यावर आलेला एक स्थानिक तरुण अमर दत्ताराम बांदेकर याला क्षुल्लक कारणावरून अमानुषपणे मारहाण केली होती, त्यात त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यात मान्युएल फर्नांडिस याने पर्यटन खात्याने मंजूर केलेला शॅक उभारून परस्पर तो हिमाचल प्रदेशमधील एका व्यावसायिकाला चालवण्यास दिल्याचे आढळून आले होते. त्याशिवाय हरमल येथील अन्य काही शॅकव्यावसायिकांनीही हिमाचलप्रदेशमधील व्यावसायिकांना आपले शॅक भाडेपट्टीवर दिल्याचे आढळून आले होते.
नियमभंग करून शॅक परप्रांतीय व्यावसायिकांना भाडेपट्टीवर चालवण्यासाठी दिल्याबद्दल मान्युएल फर्नांडिस याला 25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याने आपले शॅक भाडेपट्टीवर परप्रांतीयांना चालवण्यासाठी दिलेल्या हरमल येथील अन्य शॅकचालकांचे धाबे
दणाणले आहेत.