खुनातील आरोपीवर साक्षीदाराचा चाकूहल्ला

0
79

सांताक्रुझ येथील अश्रफ महंमद शेख (२०) या युवकावर काल दुपारी १.३० च्या दरम्यान चाकूने वार करण्याची घटना घडली. मंजुनाथ कांबळी याने हा हल्ला केल्याची तक्रार अश्रफ शेख याची आई झिनत शेख हिने पणजी पोलिसात केली आहे. या हल्ल्यात अश्रफ शेख याच्या कमरेवर, छातीवर आदी ठिकाणी जखमा झाल्या आहेत. हल्ल्यात जखमी झालेला अश्रफ महंमद शेख हा २०११ साली पणजीत झालेल्या गालू उर्फ साल्वादोर फर्नांडिस खून खटल्यातील एक आरोपी आहे तर हल्लेखोर मंजुनाथ कांबळी हा या खून खटल्यातील एक साक्षीदार आहे.गालू खून खटल्याची गुरुवारी सुनावणी होती व मंजूनाथ कांबळी हा साक्षीदार या नात्याने साक्ष देणार होता. त्याने आपणाविरुध्द साक्ष देऊ नये यासाठी अश्रफ महंमद शेख हा मंजुनाथ कांबळी याला धमकी देत होता. या पार्श्‍वभूमीवर आज मंजुनाथ कांबळी याने अश्रफ शेख याच्यावर चाकूने हल्ला केला. मंजुनाथ कांबळी हा ताळगाव येथील असून तो फरारी असल्याचे पणजी पोलीस स्थानकाचे निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी सांगितले.