खिडकी

0
750
OLYMPUS DIGITAL CAMERA
  •  गौरी भालचंद्र

घराचा अविभाज्य भाग असणारी, घरात चैतन्य निर्माण करणारी, घराला जग दाखवणारी आणि भल्या मोठ्या जगाला आपल्या इवल्याशा चौकटीत बांधणारी ही खिडकी फार पूर्वीच्या काळापासून निरनिराळ्या रूपांमध्ये आपल्यासमोर आलेली आहे.

माझी घरातील आवडती जागा म्हणजे खिडकी…. मला माझ्या घरातील हॉलची खिडकी फारच प्रिय आहे. खिडकीजवळ उभारून खाली रस्त्यावरून जाणार्‍या गाड्या पाहणे असो किंवा आजूबाजूचा परिसर… वेळ कसा मजेत जातो. घराचा अविभाज्य भाग असणारी, घरात चैतन्य निर्माण करणारी, घराला जग दाखवणारी आणि भल्या मोठ्या जगाला आपल्या इवल्याशा चौकटीत बांधणारी ही खिडकी फार पूर्वीच्या काळापासून निरनिराळ्या रूपांमध्ये आपल्यासमोर आलेली आहे.

दिवाणखान्यात आपले स्वतंत्र स्थान आणि वेगळेपण जाणवून देणारी, बाहेरील देखाव्याचं दर्शन घडवणारी अशी ही जागा आहे. सहज सुचणार्‍या कविता लिहितानादेखील या जागेवरून उठावं लागत नाही. फार छान वाटत मनाला… खिडकीबाहेरील पानाफुलांनी डवरलेली झाडं, विविधरंगी पक्ष्यांची लगबग, पानांमधून डोकावणारी त्यांची घरटी, दिवसभर आकाशाचे मनमोकळे रंग बदलत जाताना पाहणं फार मनोवेधक असतं सारं…
इमारतीचे अणकुचीदार कुंपण आणि त्यापलीकडील रस्त्यावरील तुरळक रहदारी… बाजूलाच असलेला ओढा… त्यातील पाण्याची खळखळ… मस्त वाटते अगदी! खिडकीच्या काचा आणि थोडे अंतर सोडून लावलेली लोखंडी जाळी… कुंड्यांमधून ओवा, पुदिना, मेथी, मिरच्या, तुळस, टोमॅटो आणि नाजूक फुले असणारी रोपटी… विशिष्ट प्रकारच्या दिव्याच्या योजनेमुळे मऊ लोडाला टेकून रात्री वाचन, लेखन, लॅपटॉपवर पत्रव्यवहार, गप्पा यांमध्ये वेळ आनंदात जातो. खिडकीजवळील जागेमुळे खूप समाधान, शांतता लाभते.

हवा आत-बाहेर खेळवणारी अशी खिडकी आपल्या घराचा एका अर्थाने श्वासच असतो. खिडकीला असणार्‍या आकर्षक पडद्यांमुळे खिडकीचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. खिडक्यांच्या सहवासात आल्यावर आपलं या खिडक्यांशी कधी भावनिक नातं जुळतं हे कळतच नाही. घरात असताना खिडकीजवळ उभं राहून एखादे दिवस बाहेर पाहिले नाही असं कधी होतं का हो?
मोकळ्या वेळेत आवर्जून आपण खिडकीत जाऊन बाहेरचा परिसर डोळ्यात सामावून घेतो, मग तो खिडकीबाहेर दिसणारा कधी रस्ता असेल, तर कधी सोसायटी असेल… कोणाच्या खिडकीतून डोंगर-नद्यांची दृश्ये असतील, कोणाच्या खिडकीबाहेर मैदान असेल, बाजारपेठ असेल, कोणाकडे परसबाग असेल, अंगण असेल. हे खिडकीबाहेरचं विश्व या खिडकीतून अनुभवणं काही औरच असतं.

सकाळी उठताच मी खिडकीजवळ बसून बाहेरचा निसर्ग आणि नैसर्गिक गारव्याचा मनमुराद आनंद घेत पहिला चहा घेते… दिवसाची सुरुवात खूप छान होते. पक्ष्यांचे फोटो काढण्याचे आणि निरीक्षण करण्याचे माझे ठिकाण म्हणजे ही खिडकीच. खारुताईसुद्धा येतात तिथे खायला ठेवलं की घ्यायला… खिडकीतून आलेली गार वार्‍याची झुळूक सुखद संवेदना देऊन जाते. खिडकीतले कोवळे ऊन फारच छान वाटते… खिडकीतून दिसणारा आणि ओंजळीत पडणारा पाऊस उत्साहात भर घालतो.
आमच्या घराच्या गॅलरीच्या ग्रिललासुद्धा एक मस्त विन्डो केलेली आहे. तिथून पाहिल्यावर एका विलोभनीय आकाशाचे रूप पाहायला मिळते… प्रातःकाळी आकाशातून उमलणारा सूर्याचा तांबूस गोळा झेंडूच्या फुलासारखा भासतो.. सूर्यास्तसुद्धा गॅलरीच्या खिडकीतून पाहताना मनमोहक वाटतो.
खिडकीतूनही आपल्याला बरंच काही दिसत असतं… पण आपण काय घेतो त्यातून ते महत्त्वाचं आहे. एक सांगू का… मनाची खिडकीसुद्धा तितकीच महत्त्वाची असते. प्रत्येकासाठी… आपण त्यातून नेहमीच चांगलं… मनाला योग्य… सुखकारक असेल तेव्हढंच घ्यावं नि जीवन मस्तपैकी जगावं असंच मला वाटतं.