खासदार स्वाती मालिवालप्रकरणी केजरीवाल यांनी खुलासा करावा

0
4

>> मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची दिल्लीत मागणी

आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालिवाल प्रकरणाला नऊ दिवस उलटले तरी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत तोंड का उघडलेले नाही, त्यांनी पुढे येऊन याबाबत खुलासा करावा, अशी मागणी काल गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केली.
याप्रकरणी ‘इंडिया’ आघाडीतील अन्य महिलादेखील गप्प बसल्या असल्याची टीकाही त्यांनी केली. मालिवाल प्रकरणात केजरीवाल यांनी बाळगलेले मौन हे खूप बोलके असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

आम आदमी पक्ष हा महिला व दिल्लीविरोधी पक्ष झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. वीस वर्षे पक्षासोबत असणाऱ्या एका महिला नेत्याचे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शोषण होणे ही गंभीर बाब आहे. सरकारी निवासस्थानाबाबत महिला नेत्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात तेथील मुख्यमंत्र्यांनी काहीच न बोलणे ही शरमेची बाब असल्याचेही यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री केजरीवाल याप्रकरणी पुढील तीन दिवसांत योग्य ती कारवाई करतील, असे पक्षाचे एक नेते संजय सिंग यांनी नमूद केले होते याची आठवणही डॉ. सावंत यांनी यावेळी करुन दिली.