दत्तक गाव विकासासाठी जमिनीची अडचण
खासदार शांताराम नाईक यांनी राशोल, खासदार नरेंद्र सावईकर यांनी खोला (काणकोण) तर खासदार श्रीपाद नाईक यांनी इब्रामपूर अशी गावे खासदार योजनेखाली विकास करण्यासाठी दत्तक घेतली आहेत. मात्र, विकासकामासाठी जमीन उपलब्ध होत नसल्याने या खासदारांची अडचण झालेली आहे.खासदार योजनेखाली गावात छोटी इस्पितळे, व्यायामशाळा, समाजसभागृहे, शौचालये आदीसह कित्येक प्रकल्प मार्गी लावता येतात. मात्र, गोव्यासारख्या छोट्या राज्यात हे प्रकल्प मार्गी लावणे खासदाराना शक्य होत नाही. खासदार शांताराम नाईक यांनी स्वत: काल अनौपचारिकरित्या पत्रकारांशी बोलताना ही अडचण व्यक्त केली. राज्यात ५० व्यायामशाळा, ५ छोटी इस्पितळे, समाजसभागृहे यांच्यासह कित्येक विकास प्रकल्प मार्गी लावण्यास आपण इच्छुक आहे. पण मोठी अडचण आहे ती जमिनीची. ज्या पंचायती अथवा नगरपालिका यांच्याकडे अशा प्रकल्पांसाठी जमीन आहे त्यांनी जर आपणाशी संपर्क साधला तर त्यांना वरील प्रकल्प मार्गी लावण्यास आपण सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हाय मास्ट (उंच दिवे) गावागावात बसवण्यासाठीही खासदार योजनेखाली निधी मिळतो. त्यासाठी जमीनही अगदी थोडी लागते, असेही त्यांनी यावळी सांगितले.