खासगी बसमालकांचे बुधवारी धरणे आंदोलन

0
2

सरकारकडून डिझेल, विमा अनुदान थकीत

डिझेल, विमा अनुदान आदींची थकित रक्कम देण्याबाबतीत सरकारला अपयश आलेले असून त्यामुळे खासगी बसमालक संघटनेने बुधवार दि. 26 रोजी वाहतूक खात्याच्या कार्यालयासमोर लक्षणिक धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती खासगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी दिली.

आंदोलनाची पुढील दिशा लवकरच ठरवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. खासगी बसमालक संघटनेच्या रविवारी झालेल्या आमसभेत आंदोलन करण्याचा ठराव मंजुर करण्यात आला. या बैठकीला खासगी बसमालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्य सरकारने खासगी बस मालकांसाठी इंधन योजना सुरू केली होती. त्याशिवाय विमा अनुदान योजनाही सुरू केली होती. मात्र, या योजनांची रक्कम 2017 सालापासून बसमालकांना मिळालेली नाही. थकीत रक्कम मिळावी यासाठी सरकार दरबारी कित्येकदा मागणी करूनही ही रक्कम मिळाली नसल्याचे ताम्हणकर यांचे म्हणणे आहे.