राज्य सरकारने खासगी इस्पितळांना कोविड उपचारांसाठी निश्चित केलेल्या शुल्कात दुरुस्ती करण्यात आली असून उपचार शुल्कात किरकोळ प्रमाणात कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने खासगी इस्पितळात कोविड रुग्णांवर उपचारांसाठी जारी केलेल्या शुल्काच्या विरोधात आवाज उठविल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुल्काचा फेरआढावा घेण्याची घोषणा केली होती.
सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने खासगी इस्पितळांना कोविड उपचारांसाठी जारी शुल्काचा पूर्वीचा आदेश मागे घेऊन शुल्कासंबंधी नवीन आदेश सोमवारी जारी केला. या आदेशात सर्वसाधारण वॉर्डासाठी १० हजार रुपये प्रतिदिन, ट्वीन शेअरिंगसाठी १३ हजार रुपये प्रतिदिन, प्रायव्हेट (एकेरी) रूमसाठी १६००० रुपये प्रतिदिन, आयसीयू व्हेंटिलेटरसह २४ हजार रुपये प्रतिदिन असा दर निश्चित करण्यात आला आहे. खासगी इस्पितळातील कोविड उपचारांसाठी तयार केलेल्या पॅकेजमध्ये सरकार रुग्णाला ४० सुविधांचा लाभ मिळवून देणार आहे. पॅकेजमध्ये इस्पितळातील विविध प्रकारचे शुल्क, एक्स-रे, इजीसी, यूएसजी, वैद्यकीय उपकरणे, औषधे आदींचा समावेश करण्यात आलेला आहे. तर, सर्जरी, डायगोनॉस्टीक इंटवेंन्शन, विशेष औषधे, उपचारांसाठी खास उपकरणे, अतिरिक्त ऑक्सिजनसाठी रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
खासगी इस्पितळाच्या शुल्कात रुग्णांसाठी आवश्यक औषधे, वैद्यकीय उपकरणे बाहेर ठेवण्यात आली होती. आता, नव्या दुरुस्तीमध्ये काही वैद्यकीय उपकरणे, औषधांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
बांबोळीत २२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. फोंडा येथील इस्पितळातील खाटा भरल्या आहेत. गोमेकॉच्या दोन वॉर्डमध्ये आणखी ६० रुग्णांना सामावून घेतले जाईल. होम आयसोलेशनसाठी नवीन प्रोटोकॉल निश्चित करण्यात आला आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले. राज्य सरकार कोविड उपचारांचा दीनदयाळ सामाजिक आरोग्य योजनेमध्ये समावेश करण्याचा विचार करीत आहे. त्यानंतर खासगी इस्पितळे या कार्डावर कोविड रुग्णांवर उपचार करू शकतील, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
गोमेकॉत वॉर्ड वाढवणार
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सरकारी इस्पितळातील खाटा अपुर्या पडत आहे. गोमेकॉमध्ये आणखी दोन वॉर्डमध्ये रुग्णांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. कोरोना गंभीर आजारी रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे खरेदीची प्रक्रिया सुरू झाली असून वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी आदेश जारी करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी झालेल्या एका बैठकीनंतर दिली.