खारीवाडा वास्को येथे वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू

0
18

>> गळा चिरून हत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज

खारीवाडा-वास्को येथे गायत्री मराठे (83) या ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला असून तिचा गळ्यावर सुरीने वार करून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी वास्को पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
वास्को पिशी डोंगरी येथे गायत्री मराठे या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू झाला असून सदर महिलेचा सुरीने गळा चिरून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

गायत्री मराठे या वृद्धेचा काल रविवार (दि. 21) तिच्या राहत्या घरी गळा चिरल्याच्या स्थितीत मृतदेह आढळला. घरात काम करणारी मोलकरीण रविवारी सायंकाळी घरात गेली असता, घरातील मुख्य हॉलमध्ये मराठे ह्या जमिनीवर पडल्याचे दिसून आले. तसेच त्यांच्या गळ्यावर धारदार हत्त्याराने वार केल्याचे त्या मोलकरीणीला समजताच, तिने आरडाओरड केली. नंतर आजूबाजूच्या लोकांनी येऊन वास्को पोलिसांना व नातेवाइकांना वरील घटनेची माहिती दिली. त्यानंतर वास्को पोलीस व 108 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. वास्को पोलीस निरीक्षक कपिल नायक यांनी गायत्री मराठे यांच्या पिशी डोंगरी येथील घरी जाऊन तपासकाम हाती घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत पोलीस उपनिरीक्षक रोहन नागेशकर व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांनी मोलकरणीची जबानी नोंद करून घेतली आहे.

मोलकरणीने दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी मोलकरीण वृद्ध महिला मराठ यांच्या घरी गेली होती. दार उघडे नसल्याने ती मोलकरीण माघारी गेली. सायंकाळी पाचनंतर पुन्हा ती मराठेच्या घरी आली असता, दार उघडे होते. मोलकरणीने घरात प्रवेश केला असता मराठे ह्या रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेल्या स्थितीत दिसल्या. वास्को पोलीस निरीक्षक कपिल नायक या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.