>> सुकूर-गिरी येथे वटवृक्षाचे पुनर्रोपण; मंदिरही तेथेच बांधणार
पर्वरी येथील खाप्रेश्वर देवस्थान आणि वटवृक्ष हटवण्यावरून काल देखील दिवसभर तेथील वातावरण तंग बनले होते. सोमवारी पहाटे 3 ते 4 च्या सुमारास खाप्रेश्वर देवाची मूर्ती तेथून अन्यत्र स्थलांतरित करण्यात आली. यानंतर दिवसभरात क्रेन आणि ट्रकांच्या मदतीने वटवृक्ष दोन ते तीन भागांत विभागून तो सुकूर-गिरी येथे नेण्यात आला.
रविवारपासून वटवृक्ष व खाप्रेश्वर या राखणदाराचे घुमटीवजा मंदिर हटवण्याचे काम चालू करण्यात आले होते. त्यावेळी स्थानिक भाविक व पर्यावरणवाद्यांनी त्याला जोरदार विरोध दर्शविला होता. त्यामुळे सोमवारी पहाटे गुपचूप खाप्रेश्वर देवाची मूर्ती तेथून अन्यत्र हलवण्यात आली. यानंतर दोन-तीन भागांत विभागलेला भलामोठा वटवृक्ष क्रेन व ट्रकांच्या मदतीने सुकूर गिरी येथे नेण्यात आला. तेथे त्याची पुनर्रोपण करण्यात येणार आहे.
पर्वरीतील सहापदरी उड्डाणपुलाच्या कामात अडथळा ठरत असल्याने हटवलेला वटवृक्ष व खाप्रेश्वर देवाची मूर्ती याची प्रतिष्ठापना सुकूर-गिरी येथील महामार्गाच्या बाजूला करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सुकूर-गिरी येथे या वटवृक्षाचे स्थलांतर करण्यात आल्यानंतर तेथे खाप्रेश्वर देवाचे नूतन मंदिर बांधून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे.
काँग्रेसची पोलिसांत तक्रार
काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी खाप्रेश्वर राखणदाराचे मंदिर मोडून पोलीस अधिकारी, संयुक्त मामलेदार व उड्डाण पुलाचे कंत्राटदार यांनी लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत याबाबत काल गुन्हा अन्वेषण पोलिसांत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.
अमित पालेकरांना भावना अनावर
काल पहाटे पर्वरी येथील खाप्रेश्वर राखणदाराचे मंदिर सरकारने जमीनदोस्त केल्याने आम आदमी पक्षाचे गोवा प्रमुख ॲड. अमित पालेकर यांना बरेच दुखावल्याचे दिसून आले. काल त्यांनी या प्रश्नावर पत्रकार परिषद घेतली खरी; पण यावेळी भावना अनावर झाल्याने त्यांच्या डोळ्यांतून अश्रुंचा बांध फुटला.
खाप्रेश्वराचे मंदिर पाडण्यात आल्याचे कळल्यानंतर आपणाला असहाय्य वाटू लागले. अशी असहाय्यतेची भावना आपणाला कधीही झाली नव्हती. पोलिसांनी किती तरी वेळा आपणाला चौकशीसाठी बोलावून घेतले, तेव्हाही आपण घाबरलो नव्हतो. मात्र, मंदिर पाडल्याचे कळल्यानंतर मनात भीती दाटून आल्याचे पालेकर म्हणाले.
मायकल लोबोंनी घेतली
स्थानिकांची भेट
खाप्रेश्वर देवाची मूर्ती, मंदिर आणि वटवृक्ष हटवल्याने भाविक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट असून, ते सरकारला दोष देत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या पार्श्वभूमीवर काल आमदार मायकल लोबो यांनी स्थानिकांची भेट घते लोकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
आपली विनाकारण बदनामी : खंवटे
स्थानिक आमदार तथा मंत्री रोहन खंवटे यांनी काल या विषयावर बोलताना या प्रकरणी विनाकारण आपणाला बदनाम केले जात असल्याचा आरोप केला.