खाण घोटाळ्याचे तपशील जनतेसमोर ठेवा ः चोडणकर

0
46

दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी २०१२ पूर्वी विरोधी पक्षनेता असताना राज्यात ३५ हजार कोटींचा खाण घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. यावेळी विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना हिंमत असेल तर त्यांनी आरोपांचे तपशील आता जनतेसमोर ठेवावेत व आजपर्यंत सरकारने त्यातील किती रक्कम वसूल केली आहे हेही जाहीर करावे, असे आव्हान काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिले. काल नुवे येथे समाज कार्यकर्ते जुझे काब्राल यांच्या कॉंग्रेस प्रवेशानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना खाण घोटाळ्याची चौकशी कुठपर्यंत झाली आहे, हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणीही चोडणकर यांनी केली. तसेच भाजपने खोटे आरोप करणे तसेच लोकांची दिशाभूल करणे बंद करावे, असेही चोडणकर म्हणाले.

जुझे काब्राल यांच्यासारखेच अनेक युवक आता कॉंग्रेस पक्षात सहभागी होऊ लागले असून त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस पक्ष बळकट होऊ लागल्याचेही चोडणकर यांनी यावेळी सांगितले.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, उपाध्यक्ष एम्. के. शेख व संकल्प आमोणकर, प्रदेश महिला कॉंग्रेस अध्यक्ष बीना नाईक, युवक कॉंग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, ऍलेक्स सिक्वेरा, डॉ. आशिष कामत आदी यावेळी हजर होते.