>> खनिज नमुन्यासाठी 25 सप्टेंबरपर्यंत मुदत
राज्य सरकारच्या खाण खात्याने राज्यात विविध ठिकाणी पडून असलेल्या सुमारे 1.17 दशलक्ष मेट्रिक टन खनिजाच्या हाताळणीसाठी 29 वा ई-लिलाव जाहीर केला आहे.
खाण क्षेत्र, जेटीवर पडून असलेल्या खनिजाचा ई-लिलाव येत्या 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान केला जाणार आहे. खनिज ई-लिलावासाठी 22 लॉट तयार करण्यात आले आहे.
खनिजाच्या यापूर्वी केलेल्या ई-लिलावामध्ये काही अडचणी आल्या होत्या. त्यामुळे 29 व्या खनिज ई-लिलाव प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आला आहे. खनिजाचा ई-लिलाव एमएसटीसी ई -लिलाव पोर्टलवर उपलब्ध असून खनिजाचा ई-लिलाव पोर्टलवर केला जाणार आहे. या सिंगल स्टेज फॉरवर्ड ई-लिलावामध्ये केवळ अंतिम वापरकर्ता किंवा निर्यातदारांनाच भाग घेण्याची परवानगी असेल.
ज्या खनिजाचा लिलाव केला जात आहे तो जसा आहे तसाच आहे, जेटींवर किंवा पूर्वीच्या खाणपट्ट्यांमध्ये किंवा जेटी किंवा पूर्वीच्या खाणपट्ट्यांव्यतिरिक्त इतर भूखंडांवर पडून आहे. 28 व्या ई-लिलावासाठी, राज्यभर पसरलेल्या सर्व 28 लॉट डंप ई-लिलावासाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी 12 लॉट विकले गेले. या 29 व्या ई-लिलावात उर्वरित 16 आणि आणखी 6 नवीन लॉट लिलावासाठी ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती खाण संचालक डॉ. सुरेश शानभोगे यांनी दिली. या खनिज ई-लिलावात सहभागी होणारे येत्या 25 सप्टेंबर 2023 पर्यंत खनिजाचे नमुने घेऊ शकतात. खनिज लिलावातील यशस्वी बोलिदारांनी 90 दिवसांत खनिजाची वाहतूक केली पाहिजे.