खाण खात्याच्या परवान्याशिवाय परराज्यांतून वाळू आणण्यास मनाई

0
21

परराज्यांतून वाळू आणण्यासाठी खाण खात्याचा परवाना आवश्यक असून, अन्य कोणत्याही अधिकारिणीकडून परवाना घेऊन अन्य राज्यांतील वाळू गोव्यात आणण्यास परवानगी नसल्याचे काल उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच खाण खाते हे परवाने ऑनलाइन देत असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

काही ट्रकचालक भलतेच परवाने दाखवून राज्यात वाळू आणत असल्याचे दिसून आले आहे, ही बाब अधोरेखित करत अशा ट्रकचालकांवर कारवाई करावी, असा आदेश देतानाच अशा प्रकरणी सविस्तर चौकशी केली जावी, असा आदेशही काल उच्च न्यायालयाने दिला. ही चौकशी करून अहवाल सादर करावा, अशी सूचनाही उच्च न्यायालयाने केली आहे.
दरम्यान, बेकायदेशीररीत्या वाळू काढत असताना ताब्यात घेतल्यानंतर ज्या होड्यांची मोडतोड करण्यात आली होती त्यासंबंधीचा अहवालही सरकारने सादर करावा, असा आदेशही न्यायालयाने सरकारला दिला आहे. आता पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर निश्चित करण्यात आली आहे.