>> अमित शहा यांचे डिचोलीत जाहीर सभेत प्रतिपादन
>> भाजपला साथ देण्याचे मतदारांना आवाहन
कायदेशीर बाबी पूर्ण करून गोव्यात पुन्हा खाणी पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा संकल्प असून सुवर्णमय गोवा करण्यासाठी भाजपला साथ द्या असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल डिचोली येथे जाहीर सभेत बोलताना केले. गोव्याच्या समृद्धीसाठी शांतादुर्गा देवीकडे प्रार्थना केली असल्याचे त्यांनी सांगितले.
शहा म्हणाले की, मोदी पंतप्रधान होताच देशभरात अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या. जागतिक स्थरावर मोठे कार्य केले. पाकिस्तानवर सर्जिकल हल्ला करून शत्रू राष्ट्राला इशारा दिला. गरीबांना मदत करणार्या भाजप सरकारला सहकार्य करा, असे ते म्हणाले.
अनेकांच्या असीम त्यागातून गोवा मुक्त झाला. नेहरुंचे नेतृत्व निर्णायक असते तर १९४७ सालीच गोवा मुक्त झाला असता. आज गोवा पन्नास वर्षे पूर्ण करीत असताना निवडणूक आली आहे. कॉंग्रेसचे राहुल व भाजपचे नरेंद्र मोदी या दोघांत कुणाला निवडायचे ते ठरवायचे आहे.
कॉंग्रेसचे शासन अस्थिरता तर भाजपने विकास व स्थिरतेचे सरकार दिले. पर्रीकर यांनी मोठे योगदान दिल्याचे ते म्हणाले.
आज गोवा सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. कोरोना लसीकरण १०० टक्के पूर्ण झाले आहे. डबल इंजिन सरकारने अनेक योजना पूर्ण केल्या. कॉंग्रेस सरकारच्या कार्यकाळात काहीच झाले नाही. मात्र, मोदी सरकारने गोव्याला मोठा निधी दिला. कॉंग्रेसने विकास व मुक्ती देण्यासही उशीर केला, अशी टीका शहा यांनी केली.
भाजपला बहुमत
मिळणार : सावंत
पाटणेकर कार्यतत्पर नेते आहेत. पूर्ण बहुमताने भाजप निवडून येणार असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. डिचोलीचा विकास आपली जबाबदारी आहे. जनतेने घाबरण्याची गरज नाही असे ते म्हणाले.
प्रवीण दरेकर यांनी स्थिर सरकार देण्याची धमक भाजपमध्ये आहे, असे सांगितले. तानावडे यांनी तृणमूल व आपवर टीका केली. भाजपने प्रत्येक घरात समृद्धी नांदण्यास अनेक योजना राबविल्याचे ते म्हणाले.
डिचोली येथे भाजप उमेदवार राजेश पाटणेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, राहुल नार्वेकर, बसवराज, कुंदन फळारी, राजेश पाटणेकर, प्रेमेंद्र शेट, कुलाब्याचे आमदार प्रवीण दरेकर, सतीश गावकर, विश्वास गावकर, कुंदन फळारी आदी मान्यवर उपस्थित होते. कुंदन फळारी यांनी स्वागत, विश्वास गावकर यांनी सूत्रसंचालन तर सतीश गावकर यांनी आभार मानले.
चेहरा बदलून आलेल्या पक्षापासून सावध राहा
विकासकामात खो घालणारे गोव्यात चेहरा बदलून आले आहेत, असे तृणमूल कॉंग्रेसचे नाव न घेता शहा यांनी निशाणा साधला. सुवर्णमय गोव्याची निर्मिती भाजपच करू शकते असे सांगून डिचोलीच्या विकास योजनांची माहिती दिली. भाजपने २२ संकल्प केले असून २२ जागा जिंकून गोवा सुवर्णमय करण्याचा ध्यास आहे, असे शहा यांनी सांगितले.