खाण अवलंबितांनी पणजी येथे काल विराट मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चामुळे म्हापसा-पणजी या राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची मोठी कोंडी झाली. काल सकाळपासूनच पर्वरी परिसरातील महामार्ग वाहनांनी खचाखच भरला होता. येथील सर्व्हिस रोडही वाहनांनी ब्लॉक झाला होता.
पणजी येथे काल खाण अवलंबितांनी आयोजित केलेल्या मोर्चामुळे मांडवी नदीवरील एक पूल बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे महामार्गावर सकाळपासून वाहनांची भली मोठी रांग लागली होती. सदर वाहनांची रांग गिरी-म्हापसापर्यंत लागली होती. या वाहतूक कोंडीचा सर्वसामान्य नागरिकांना, नोकरदारवर्गाला त्रास झाला. वाहतूक कोंडीचा सर्वांत जास्त फटका बसला तो पर्वरी येथील नागरिकांना. मांडवी नदीवरील एक पूल बंद असल्यामुळे मुख्य महामार्गासह पर्वरीतील सर्व्हिस रोड आणि इतर अंतर्गत रस्तेही वाहनांनी भरून गेले होते. त्यामुळे येथील नागरिकांना सकाळी दैनंदिन कामासाठी बाहेर पडणे कठीण झाले होते.
राज्यात बारावीची परीक्षा सुरू आहे. कालसुद्धा बारावीचा पेपर होता. बारावीच्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून सरकारकडून मोर्चेकरांना पणजीत सकाळी १०.३० नंतर येण्याचे आवाहन केले होते. तरीही मोर्चेकरी सकाळपासूनच पणजीत येत होते. त्यामुळे येथील रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र, पर्वरी परिसरातील पालकांनी आपल्या मुलांना सकाळीच परीक्षाकेंद्रावर सोडल्यामुळे येथील विद्यार्थी परीक्षेला वेळेत पोचू शकले.
दरम्यान, काल पर्वरीत झालेल्या वाहतूक कोंडीचा त्रास नोकरदारवर्गाबरोबर पर्यटक आणि विमान प्रवाशांना झाला. महामार्गावर मेगाब्लॉॅक झाल्यामुळे विमान प्रवाशांना, पर्यटकांना वाहनातून उतरून सामानासकट पायपीट करून पर्वरीतून पणजीला जावे लागल्याचे दृश्य दिसत होते. महामार्गावरील कोंडीमुळे पर्वरीतील अंतर्गत मार्गावर आणि सर्व्हिस रोडवरही वाहनांची वर्दळ वाढली होती. सर्व्हिस रोडतर पूर्णतः वाहनांनी भरून गेला होता त्यामुळे येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. संपूर्ण महामार्गावर वाहतूक पोलीस तैनात केले होते. तरीही वाहतुकीवर नियंत्रण मिळविताना पोलिसांची तारांबळ उडत असल्याचे चित्र दिसत होते.