राज्यात खाण व्यवसाय सुरू करण्यापूर्वी 39 अटींची पूर्तता करण्याचे जे आश्वासन राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिले होते, ते पूर्ण न केल्यास गोवा फाऊंडेशन न्यायालयात धाव घेईल आणि खाणी सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देईल, असा इशारा गोवा फाऊंडेशन ह्या बिगर सरकारी संघटनेने राज्य सरकारला काल दिला. ह्या 39 अटी कोणत्या आहेत त्याची माहिती गोवा फाऊंडेशनने गेल्या 4 डिसेंबर रोजी लिहिलेल्या पत्रातून खाण खात्याला दिली आहे.
ज्यांनी बेकायदेशीररित्या खाण उद्योग केला होता, त्यांच्याविरूद्ध चौकशी सुरू करून गुन्हे दाखल करणे, खाण खात्यात 435 पदे तयार करून ती भरणे, खनिज वाहतुकीसाठी मायनिंग कॉरिडॉर तयार करणे व त्यासाठी खाणीतून मिळणारी 60 टक्के एवढी रॉयल्टी वापरणे, शेतीत वाहून गेलेली टाकाऊ खनिज माती शेतीतून काढून टाकणे, खाणी व खनिज व्यवहार ह्या संबंधीची सगळी माहिती वेबसाईटवर टाकणे अशा एकूण 39 अटींची पूर्तता करण्याची मागणी गोवा फाऊंडेशनने केली आहे.
39 अटींची पूर्तता करण्याचे आश्वासन राज्य सरकारने एका प्रतिज्ञापत्राद्वारे शपथ घेऊन सर्वोच्च न्यायालयात दिलेले आहे, असे गोवा फाऊंडेशनने म्हटले आहे. सरकारने या अटींची पूर्तता केल्याच्या कोणत्याही ठळक अशा खुणा सध्या तरी दिसत नसल्याचा दावाही गोवा फाऊंडेशनने केला आहे.