>> मुख्यमंत्र्यांची माहिती, केंद्रिय गृहमंत्री, खाणमंत्र्यांची दिल्लीत भेट
गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत सुरू व्हावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नरत असून डिसेंबरपर्यंत राज्यातील खाणी सुरू होण्याची दाट शक्यता असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सांगितले. केंद्र सरकार गोव्यातील बंद पडलेला खाणीचा प्रश्न न्यायालयीन मार्गाने अथवा राजकीय तोडगा काढून सोडवू शकते असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आपल्या नवी दिल्लीतील भेटीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, खाणमंत्री प्रल्हाद जोशी, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर व अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांची भेट घेऊन त्यांच्याशी गोव्याशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यात प्रामुख्याने चर्चा झाली ती राज्यातील बंद पडलेल्या खाण उद्योगासंबंधी.
केंद्र सरकारला गोव्याची खाण समस्या लवकरात लवकर सुटलेली हवी आहे. कुठल्याही परिस्थितीत गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत सुरू व्हावा असे केंद्र सरकारला वाटत असून त्या दृष्टीने केंद्राने प्रयत्न चालवले आहेत. हा प्रश्न न्यायालयीन मार्गाने अथवा राजकीय तोडगा शोधून एकदाच सोडवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नरत असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
खाणींबरोबरच आपण केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी गोव्याचे शॅक धोरण, गोव्याचा किनारी आराखडा, ‘ब्ल्यू फ्लॅग’ तसेच राज्यातील खासगी वनक्षेत्र या प्रश्नांवर चर्चा केल्याचे मुक्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही भेट घेतली. राज्याने यापूर्वी खाण बंदीच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडे सुमारे दीड ते दोन हजार रुपयांचे आर्थिक पॅकेज मागितले आहे. तसेच पूरगस्तांसाठीही गोव्याने केंद्राकडे मदत मागितली होती. परंतु अजून ती मिळालेली नाही यावरही चर्चाझाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.