खाणबंदीमुळे राज्यात बेरोजगारीचे संकट

0
125

>> वेदांताच्या एकूण १८०० कामगारांना नोटीस

>> घरीच बसून पगार देण्याचे आश्‍वासन

खाणबंदीमुळे राज्यात बेरोजगारीचे संकट कोसळले असून डिचोलीतील ३०० कामगारांना कामवार न येण्याची नोटीस बजावल्याची घटना ताजी असतानाच काल वेदांता (सेझा) व्यवस्थापनाने सुर्ला, सोनशी व कोडली येथील खाणींवरील कामगारांनाही तशाच प्रकारची नोटीस बजावल्याने १८०० कामगारांची नोकरी धोक्यात आली आहे. उद्यापासून कामावर येऊ नये, गरज असेल तेव्हाच कामगारांना बोलावले जाईल, असे स्पष्ट करत पुढील निर्णय होईपर्यंत कामगारांना घरी बसून पगार दिला जाणार असल्याचे नोटिशीत म्हटले आहे.

वरील नोटिशीबाबत कामगारांना कल्पना होती अशी माहिती देण्यात आली होती असे कंपनीचे म्हणणे आहे. वेदांता कंपनीच्या या निर्णयामुळे सध्या १८०० खाण कामगारांना घरी बसावे लागणार आहे. व्यवस्थापनाने तातडीने तोडगा काढून कामगारांना न्याय द्यावा व कामाची लेखी हमी द्यावी अशी मागणी काल डिचोली येथील कामगार संघटनेच्या पदाधिकारी मंडळाने उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक यांची भेट घेऊन केली. त्यानंतर उपजिल्हाधिकार्‍यांनी कंपनी व्यवस्थापनाचे अधिकारी व कामगार संघटनेचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन माहिती जाणून घेतली.

कामगारांमध्ये अस्वस्थता
कंपनीने कामगारांना घरीच बसा असे सांगितले असून काही मशीनरी हलवली असल्याने कामगार वर्गात अस्वस्थता निर्माण झाली आहे. कामगारांना पुढील पगाराची व कायमची हमी कंपनीने लेखी स्वरूपात द्यावी अशी मागणी कामगार संघटनेने केली आहे. त्याबाबत व्यवस्थापनाने वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चेअंती निर्णय कळवणार असल्याचे उपजिल्हाधिकार्‍यांना सांगितले. कामगार संघटनेचे नीलेश कारबोटकर, किशोर लोकरे, कामगारांचे सल्लागार अजय प्रभुगावकर व कंपनी व्यवस्थापनातर्फे मांद्रेकर उपस्थित होते.

उपजिल्हाधिकार्‍यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे लागणार असल्याने कामगारांना घरीच राहा असा सल्ला दिला. पुढील निर्णय होईपर्यंत वेतन दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खर्चात कपात करण्यासाठी हा निर्णय घेतला असून कामगारांना कसलाच धोका नाही असेही त्यांनी सांगितले. मशीनरी खराब होण्याची भीती असल्याने दुसरीकडे वापरासाठी नेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्टीकरण दिले. दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांनी कामगारांना लेखी हमी हवी असल्याने कंपनीने ती देण्याच्या सूचना केल्या आहेत.