>> गोवा मायनिंग पीपल फ्रंटची टीका
भाजप सरकारने खाणबंदी प्रश्नी तोडगा काढण्यासाठी वेळकाढू धोरण अवलंबिले आहे, अशी टीका गोवा मायनिंग पीपल फ्रंटचे निमंत्रक पुती गावकर यांनी काल केली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खाणबंदी प्रश्नी न्यायालयाद्वारे तोडगा काढण्यात येईल असे वक्तव्य केले आहे. तर भाजपचे आमदार नीलेश काब्राल यांनी न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली जाईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत मंगळवारी दिली होती.
या पार्श्वभूमीवर बोलताना गावकर म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने खाण प्रश्नी राज्य सरकारला आवश्यक निर्देश देऊन याचिका निकालात काढली आहे. राज्यातील खाण प्रश्नी कुठल्याही न्यायालयात सध्या खटला सुरू नाही. त्यामुळे हस्तक्षेप याचिका कशी दाखल केली जाऊ शकते? असा प्रश्न गावकर यांनी उपस्थित केला.
अध्यादेशाद्वारे तोडगा शक्य
राज्य सरकारने न्यायालयाच्या निर्देशानुसार आवश्यक कृती करून खाण व्यवसाय पुन्हा सुरू केला पाहिजे. खाण बंदी प्रश्नावर अध्यादेशाच्या माध्यमातून तोडगा काढला जाऊ शकतो. खाण प्रश्नी अध्यादेश जारी केल्यास त्या अध्यादेशाला कुणाकडून न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. याबाबत सरकारने विचार करू नये, असेही गावकर यांनी सांगितले. पणजीतील आझाद मैदानावर सोमवारपासून धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. अध्यादेश जारी करून खाण बंदीच्या प्रश्नावर तोडगा निघेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असेही गावकर यांनी सांगितले.