खाणप्रश्‍नी तोडगा काढण्याचे मुख्यमंत्र्यांना मोदींचे आश्‍वासन

0
299

>> पंतप्रधानांशी कोरोनावरही चर्चा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल बुधवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली व त्यांच्याशी राज्यातील बंद असलेल्या खाण प्रश्‍नावर सुमारे अर्धा तास चर्चा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या १०-१५ दिवसांत या प्रश्‍नी केंद्रातील संबंधीत खात्यांशी चर्चा करुन त्यांना आवश्यक ते निर्देश देण्याचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिले. हे काम पूर्ण झाले की नंतर पुढे काय करायचे ते ठरवू, असे मोदींनी सावंत यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील खाण उद्योग बंद असल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेवर अनिष्ट परिणाम झालेला असून बेरोजगारी कधी नव्हे एवढी वाढली असल्याचे त्यांच्या नजरेत आणून दिले. राज्यातील खाणप्रश्‍नी सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केलेली असली तरी खाण विषय धसास लागू शकलेला नसून न्यायालयात फक्त सुनावण्या होण्यापलिकडे काही होऊ शकलेले नाही. या पार्श्वभूमीवर आता हा जटील प्रश्‍न सोडवण्यासाठी केंद्रानेच पावले उचलावीत अशी विनंती या चर्चेच्या दरम्यान मुख्यमंत्र्यानी पंतप्रधानांना केल्याचे मुख्यमंत्र्यांचे ओएस्‌डी उपेंद्र जोशी यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना सांगितले.

काल बुधवारी सकाळी १०.४० वाजता प्रमोद सावंत यांनी पंतप्रधानांची भेट घेत सुमारे २५ मिनिटे चर्चा केली. यावेळी त्यांनी कोविड व्यवस्थापनावरची चर्चा केली. मात्र म्हादई विषयावर कोणतीच चर्चा झाली नाही. तद्नंतर सावंत यांनी दुपारी १२.३० वा. केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेऊन त्यांच्याशीही खाण प्रश्‍नावर चर्चा केली.