खाणप्रश्‍नी केंद्रीय खाणमंत्री तोमर यांना निवेदन

0
119

गोवा मायनिंग पीपल फ्रंटच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय खाण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांची नवी दिल्ली येथे काल भेट घेऊन राज्यातील बंद पडलेल्या खाणी पुन्हा सुरू करण्याची मागणी करणारे एक निवेदन सादर केले.
फ्रंटचे निमंत्रक पुती गावकर व इतरांनी निवेदन सादर केले. यावेळी केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांची उपस्थिती होती.

गोवा दमण व दीव खाण कायदा १९८७ मध्ये दुरुस्ती करून बंद पडलेल्या खाणी पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी केंद्रीय मंत्री तोमर यांच्याकडे करण्यात आली आहे, असे निमंत्रक गावकर यांनी सांगितले. राज्यातील खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने योग्य प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठविला पाहिजे, असे केंद्रीय मंत्री तोमर यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
राज्य सरकारकडून खाणी पुन्हा सुरू करण्याबाबत प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर आवश्यक पुढील कृती त्वरित केली जाईल, असे आश्‍वासन केंद्रीय मंत्री तोमर यांनी दिले.

सर्वोच्च न्यायालयाने ७ फेब्रुवारीला दिलेल्या निवाड्यात राज्यातील ८८ खाणीचे लीज नूतनीकरण रद्दबातल ठरविण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील खाण व्यवसाय १६ मार्च २०१८ पासून बंद ठेवावा लागला आहे.
राज्यातील खाण व्यवसाय पुन्हा सुरू व्हावा म्हणून फ्रंटकडून प्रयत्न केला जात आहे. सरकारचे बंद पडलेल्या खाण प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी राजधानी पणजीसह साखळी, सावर्डे आणि धारबांदोडा येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे.