लॉकडाऊनच्या काळात राज्यातील खासगी प्रवासी बससेवा बंद असल्याने बस व्यावसायिक, चालक, वाहक यांना मोठ्या आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सरकारी यंत्रणेचे खासगी प्रवासी बस व्यावसायिक व इतरांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार ३० एप्रिलपासून कदंब बसस्थानकावर आगळ्या वेगळ्या पद्धतीने निदर्शने केली जाणार आहेत, अशी माहिती अखिल गोवा खासगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदिप ताम्हणकर यांनी काल दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील प्रवासी वाहतूक सुरू करताना खासगी प्रवासी बसमालकांचा विचार करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात खासगी बसमालक व इतरांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशी खंत संघटनेचे सरचिटणीस ताम्हणकर यांनी व्यक्त केली.
लॉकडाऊनच्या काळात राज्यातील १४६० खासगी प्रवासी बसगाड्या बंद आहेत. बस व्यावसायिकांबरोबर चालक, वाहक यांची आर्थिक मिळकत बंद झाल्याने आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राज्यातील प्रवासी बससेवा सुरू करताना कदंब बसगाड्यांबरोबर काही खासगी प्रवासी बसगाड्या सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. तथापि, राज्याची आर्थिक स्थिती योग्य नसल्याने खासगी बसगाड्या सुरू करण्यास टाळाटाळ केली जात आहे. कोरोनाच्या काळात आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याकडे निधीची कमतरता असल्याने केंद्राकडे अतिरिक्त निधीची मागणी करण्याची गरज आहे. स्वयंरोजगारातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणारे आर्थिक संकटात आहेत. त्यांना सरकारकडून आर्थिक सहाय्य करण्याची गरज आहे, असेही ताम्हणकर यांनी सांगितले.
खासगी बस व्यावसायिकांकडून मास्क, सामाजिक अंतराचे पालन करून साखळी पद्धतीने बेमुदत निदर्शने केली जाणार आहेत. खासगी प्रवासी बससेवा बंद झाल्यानंतर बस व्यावसायिकांची साधी विचारपूस करण्यात आलेली नाही. बस व्यावसायिकांना रस्त्यावर येऊन निदर्शने करण्यास भाग पाडण्यात आले आहे. आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांसह सर्व संबंधितांना माहिती देण्यात आली आहे, असेही ताम्हणकर यांनी सांगितले.