खलिस्तानी म्होरक्या मिंटू बोरीत राहून गेल्याचे उघड

0
117

>> तब्बल बारा वर्षे होते वास्तव्य

>> कुटुंबीयासह राहत होता बंगल्यात

पंजाबमधील नाभा तुरुंगातून सशस्त्र हल्लेखोरांनी सुटका केल्यानंतर पुन्हा जेरबंद करण्यात आलेला खलिस्तान कमांडो फोर्सचा म्होरक्या हरमिंदर सिंग मिंटू कमळामळ, बोरी येथे काही वर्षांपूर्वी एका बंगल्यात कुटुंबीयासह राहत होता, अशी खळबळजनक माहिती उघड झाली आहे. यामुळे सदर बंगल्याच्या परिसरात दहशतविरोधी पथकाच्या पोलिसांसह स्थानिक पोलिसांचा कडक पहारा ठेवण्यात आला आहे.

वरील माहिती उघड झाल्यानंतर बोरी महामार्ग तसेच राज्यभरात नाकाबंदी करण्यात आली असून संशयास्पद आढळणार्‍यांची कसून झडती घेतली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १९९८ ते २००९ पर्यंत मिंटू त्याची पत्नी, दोन मुले व दोघा भावांसह बोरी येथील बंगल्यात राहत होता. सुमारे बारा वर्षे त्याचे बोरी येथे वास्त्यव्य होते. २००९ सालापासून मिंटू गायब झाल्यानंतर २०११ साली त्याची पत्नी व दोन मुले कॅनडा येथे स्थायिक झाल्याची माहिती मिळाली
आहे.
सध्या मिंटू याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असल्या तरी त्याचे अन्य बेपत्ता असलेले साथीदार बोरी येथील बंगल्यावर येण्याची शक्यता असल्याने बोरी येथे महामार्गावर नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच बंगल्याच्या परिसरात एटीएस पोलीस तळ ठोकून आहेत. खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिन्याभरापूर्वी पंजाब पोलिसांनी मिंटू याच्या वरील बंगल्याजवळ तळ ठोकला होता.
गोवा पोलिसांकडून चौकशी
दरम्यान, खलिस्तानी म्होरक्या मिंटूचा गोव्यात वावर होता याविषयी स्थानिक पोलिसांनी चौकशी सुरू केली. गोव्यात येऊन विदेशात पळून जाण्याचा त्याचा घाट होता असे चौकशीत निष्पन्न झाल्याने पोलीस सतर्क झाले आहेत. मात्र, अधिकृतपणे आम्हांला तो गोव्यातून विदेशात पळून जाणार होता अशी माहिती मिळालेली नसल्याचे पोलीस उपमहासंचालक विमल गुप्ता यांनी सांगितले. गोव्याशी त्याच्या संबंधाविषयी माहिती मिळवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
बोरी पंचायतीचे माजी सरपंच सुनील सावकार यांनी सध्या पोलिसांनी पकडलेला हरमिंदर मिंटू हा काही वर्षांपूर्वी बोरी येथील बंगल्यात राहत होता, या वृत्ताला पुष्टी दिली. सध्या त्याचे दोघे भाऊ त्या ठिकाणी राहत असले तरी त्यांचा परिसरातील लोकांशी अधिक संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. तो दहशतवादी असल्याची बोरीतील लोकांना कल्पना नव्हती असे त्यांनी सांगितले.