गोवा सरकारच्या अनिवासी भारतीय आयोगाच्या (एनआरआय) खलाशी निवृत्ती वेतन योजनेची कार्यवाही समाज कल्याण खात्याकडून केली जाणार आहे, अशी माहिती आयोगाचे संचालक ऍन्थोनी डिसोझा यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
आयोगाने निवृत्त खलाशांना निवृत्ती वेतन देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. तसेच निवृत्ती वेतन योजनेसाठी येणार्या अर्जांची छाननी करण्यासाठी खास एजन्सीची नियुक्ती केली आहे. आयोगाकडे निवृत्ती योजनेसाठी सादर करण्यात येणार्या अर्जांची छाननी या एजन्सीकडून केली जाणार आहे. सदर एजन्सीकडून अर्जाबाबत सविस्तर अहवाल सादर झाल्यानंतर पेन्शनचे अर्ज कार्यवाहीसाठी समाज कल्याण खात्याकडे पाठविले जाणार आहेत. खलाशी निवृत्त योजनेखाली २५०० रुपये निवृत्ती वेतन दिले जात आहे. आत्तापर्यंत सुमारे २४०० जणांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला आहे, असेही डिसोझा यांनी सांगितले.
अनिवासी भारतीयांचे जागतिक संमेलन वर्ष २०२० च्या अखेरीस घेण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यापूर्वी वर्ष २००७ मध्ये अनिवासी भारतीयांचे जागतिक संमेलन गोव्यात आयोजित करण्यात आलेले आहे. एनआरआय गोवाचा ट्विटर अकाउंटचा शुभारंभ आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे. एनआरआय गोवाची वेबसाईट कार्यरत आहे. त्या माध्यमातून जगभरातील अनिवासी भारतीय आपल्या तक्रारी, सूचना मांडत आहेत. आता, ट्विटरच्या माध्यमातून सूचना, तक्रारी मांडू शकतात, असे सावईकर यांनी सांगितले.