खर्गेंनी स्वीकारला कॉंग्रेस अध्यक्षपदाचा पदभार

0
9

कॉंग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काल कॉंग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. खर्गे यांनी बुधवारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत दिल्लीतील अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या मुख्यालयात अधिकृतपणे पक्षाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. कॉंग्रेस केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी खर्गे यांना निवडणूक प्रमाणपत्र दिले. कॉंग्रेसचा वारसा पुढे नेणे ही अभिमानाची बाब असल्याचे यावेळी खर्गे म्हणाले.

यावेळी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींसह कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

सरकार झोपले आहे, पण ईडी, सीबीआय, आयकर विभाग २४ तास काम करत आहे. नवीन भारतात गोडसेला देशभक्त आणि महात्मा गांधींना देशद्रोही म्हटले जात असल्याची खंत मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केली.

सुकाणू समितीची घोषणा

कॉंग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काल सुकाणू समितीची घोषणा केली. कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, राहुल गांधी यांच्यासह कॉंग्रेस कार्यकारी समितीच्या जवळपास सर्व सदस्यांचा सुकाणू समितीमध्ये समावेश आहे.