महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीची तारीख काल जाहीर झाली. पुढील महिन्यात पंधरा ऑक्टोबरला तेथे निवडणूक होईल आणि सत्ता कोणाच्या पारड्यात जाते ते एकोणिस ऑक्टोबरला स्पष्ट होईल. गेल्या लोकसभा निवडणुकीतील परिवर्तनाची अभूतपूर्व लाट कितपत टिकलेली आहे आणि किती ओसरलेली आहे, त्याचे सुस्पष्ट दर्शन या निवडणुकीत घडणार असल्याने त्याविषयी उत्सुकता आहे, कारण हरियाणात कॉंग्रेस, तर महाराष्ट्रात कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी सत्तेत आहे. पण त्यापूर्वीच मोदी सरकारची कसोटी आजच्या पोटनिवडणुकांत लागणार आहे. आज लोकसभेच्या तीन आणि विविध राज्यांतील विधानसभांच्या ३३ जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. लोकसभेच्या ज्या तीन जागांवर आज पोटनिवडणूक होणार आहे, त्यापैकी वडोदर्याची जागा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या वाराणशीतील विजयानंतर सोडून दिलेली होती, त्यामुळे तेथील निकाल कसा असेल त्याचा अंदाज बांधता येतो. तेलंगणांतील मेढक आणि उत्तर प्रदेशमधील मुलायमसिंहांच्या मैनपुरीमध्येही आज पोटनिवडणूक होते आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत पानीपत झालेल्या समाजवादी पक्षासाठी मैनपुरीची जागा अर्थातच प्रतिष्ठेची आहे. पण उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात, आसाम, त्रिपुरा, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ व सिक्कीम आदी राज्यांमध्ये होणार्या विधानसभेच्या एकूण ३३ जागांच्या पोटनिवडणुकांतून खरे देशव्यापी चित्र स्पष्ट होऊ शकते. गेल्या महिन्यांत चार राज्यांमध्ये पोटनिवडणूक झाली होती, परंतु त्या निवडणुकीत मोदी लाटेचा करिष्मा काही दिसला नव्हता. त्या पोटनिवडणुकांत अठरापैकी भाजप आणि मित्रपक्षांना आठ जागा जिंकता आल्या, तर कॉंग्रेस आणि मित्रपक्षांना दहा जागा प्राप्त झाल्या होत्या. आज होणार्या विविध राज्यांच्या विधानसभांच्या पोटनिवडणुकीतून स्थानिक मुद्द्यांबरोबरच मोदी सरकारच्या गेल्या शंभर दिवसांच्या कामगिरीचे प्रतिबिंब उमटल्यावाचून राहणार नाही. वरील ३३ पैकी अकरा जागा उत्तर प्रदेशातील आहेत. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने धमाल उडवून दिली होती. लोकसभेच्या ऐंशीपैकी ७१ जागा भाजपाच्या पारड्यात गेल्या होत्या. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची पारंपरिक मते भाजपाच्या बाजूने वळली होती. त्यामुळे समाजवादी पक्षाने लोकसभेच्या सात जागा राखल्या, पण बहुजन समाज पक्षाला खातेही खोलता आले नव्हते. दोन्ही पक्षांसाठी ही पोटनिवडणूक अस्तित्वाची लढाई आहे. गुजरात आणि राजस्थानमध्ये तर गेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा सफाया झाला. जिथे विरोधकांना खातेही खोलता आले नाही, तेथील विधानसभेच्या तेरा जागांवर विरोधी पक्ष स्वतःचे अस्तित्व दाखवू शकतात की नाही तेही आजच्या पोटनिवडणुकीत स्पष्ट होणार आहे. आसामसारख्या दूरस्थ राज्यामध्येही भाजपाने गेल्या लोकसभा निवडणुकीत आपले अस्तित्व दाखवले होते. तेथील विधानसभेच्या तीन जागांवर आज निवडणूक होते आहे. पश्चिम बंगालच्या दोन जागांवर सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसला आपली राज्यावरील पकड सिद्ध करावी लागणार आहे. त्रिपुरामध्ये डावी आघाडी सत्तेवर आहे. छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, सिक्कीमध्येही काही जागांसाठी पोटनिवडणूक होते आहे. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये स्थानिक मुद्दे प्राधान्यक्रमाने येत असतात हे खरे असले, तरी गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे अभूतपूर्व परिवर्तन घडून आले, त्याचा प्रभाव अद्याप उरला आहे की नाही हे ही पोटनिवडणूक सांगणार आहे आणि आगामी दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकांसंदर्भात या पोटनिवडणुकांचा निकाल त्यामुळे महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत देशभर दारूण स्थितीत आलेल्या कॉंग्रेससाठी तर हा जणू जीवनमरणाचा प्रश्न आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाने गलितगात्र झालेल्या कॉंग्रेस नेतृत्वाला ही पोटनिवडणूक नवसंजीवनी देणार का हे निकाल सांगतील. आगामी विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी त्यांना हे जीवनसत्त्व आवश्यक बनले आहे. परिवर्तनाचा किती लाभ भाजपाला उठवता आला आहे आणि ऐतिहासिक मोदी लाटेचा करिष्मा किती उरला आहे आणि किती विरला आहे, हेही या निवडणुकांतून दिसणार आहे!