खरीप हंगामात २० टक्के उत्पादन वाढीची अपेक्षा

0
93

दक्षिण गोव्यातील सासष्टी भागात भार कापणीस सुरुवात झाली असून यंदा खरीप हंगामात भाताच्या उत्पादनात किमान २० टक्के वाढ होईल, अशी अपेक्षा वरिष्ठ कृषी अधिकार्‍यांनी व्यक्त केली. गेल्या वर्षी हंगामात सुमारे २८ हजार हॅक्टर जमिनीत भाताची लागवड केली होती. यंदा त्यातही वाढ झाली आहे. किती वाढ झाली यासंबंधीची संपूर्ण माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही. शेतकरी सध्या समाधानी असून येत्या दिवसात पाऊस पडल्यास भात कुजण्याची शक्यता आहे, असे अधिकार्‍यांचे मत आहे. सरकारने दिलेल्या अनुदानाचा शेतकर्‍यांनी चांगला उपयोग केला आहे.
श्री पध्दतीच्या भात शेतीमुळे उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते. असे अधिकार्‍यांनी सांगितले.
गेल्या जून महिन्यात पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतातूर बनले होते. परंतु नंतर पाऊस चांगला पडला. त्यामुळे त्याचा शेतीवर वाईट परिणाम झाला नाही, असे अधिकार्‍यांनी सांगितले. बार्देशमधीलही काही भागात कापणी सुरू आहे. पेडणे, केपे, काणकोण या भागात कापणी उशीरा सुरू होते.
यांत्रिकीकरणावर भर
मजुरांच्या समस्येवर उपाय म्हणून सरकारने आता या क्षेत्रात यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. भात कापणीसाठी खात्याने १०५ भात कापणी यंत्रे उपलब्ध करून दिली आहेत.
या यंत्रासाठी ताशी २२०० रुपये खर्च येतो पैकी ५० टक्के खर्च अनुदानाच्या रुपाने दिला जातो. त्याचा शेतकर्‍यांना बराच लाभ होतो. गेल्या वर्षी प्रती भात कापणी यंत्रावर २००० रुपये खर्च होत होता. यंदा त्यात वाढ करण्यात आली आहे.