– प्रा. रमेश सप्रे
‘सध्या ढोलताशांच्या गजरात गणरायाचं आगमन होतं. त्यात लोकांची उत्स्फूर्त भावभक्ती दिसून येते की स्पर्धात्मक मस्ती?’ असा प्रश्न एका प्रसिद्ध दैनिकाने आपल्या वाचकांना विचारला होता. बहुसंख्य वाचकांनी ‘स्पर्धात्मक मस्ती’च्या बाजूने कौल दिला.
जरा खोल विचार केला तर आज ज्याला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणतात त्याच्या प्रत्येक अंगाबद्दल असे म्हणता येईल की ‘भक्ती कमी, मस्ती अधिक!’
गणेशमूर्तींची भव्यता, त्यावर लोकांनी दिलेल्या वर्गणीच्या पैशांची उधळपट्टी, अन् कळस म्हणजे गणेशाला आणताना व पोचवताना वाहतूक, विजेच्या तारा, वृक्षांच्या फांद्या या सर्वांनाच होणारा त्रास, नव्हे जाच!
रस्त्यावर उभारले जाणारे अवाढव्य मंडप, उभ्या केलेल्या निरनिराळ्या नगराच्या, पवित्र स्थानाच्या, ऐतिहासिक स्थळांच्या प्रतिकृती. त्या हुबेहूब दिसल्या तरी त्यावर होणारा लक्षावधी रुपयांचा चुराडा काही दिवसांपुरताच होतो हेही लक्षात घ्यायला हवे!
काहीजण म्हणतात की अशा उत्सवातून अनेक हातांना काम, पोटांना अन्न, बेकारांना मदतीचा हात मिळतो. पण त्याचबरोबर सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या एकूण जमाखर्चाचा विचार केला तर पैशांचा अपहार व भ्रष्टाचारही ‘भव्य’ प्रमाणातच होतो.
सर्वप्रकारचं प्रदूषण जर अशा सार्वजनिक उत्सव-महोत्सवातून होत असेल तर अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. सर्व पातळ्यांवर असं विचारमंथन व्हायला हवं. तसं ते गेली काही वर्षे अनेक स्तरांवर, विविध माध्यमांतून सुरूही आहे.
अशा विचारमंथनाचं फलितही (खरं तर नवनीत) दिसू लागलंय. एकाच गोष्टीचा विचार करूया. हल्ली वृत्तपत्रं, वाहिन्या, ग्रामपंचायती तसेच अनेक गैरसरकारी संस्था (एनजीओ) गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक स्पर्धा भरवतात. हा प्रयोग गेली अनेक वर्षे चालू आहे. पण आता त्यांचा केंद्रबिंदू ‘पर्यावरणस्नेही गणेशोत्सव’ असा व्हायला हवा.
पूर्वी ‘मखर सजावट स्पर्धा’ असायची. त्यात सजावटीतलं कलाकौशल्य हा मुख्य मुद्दा असायचा. आता थर्माकोल, प्लॅस्टिकचा वापर न करता मखर सजावट अशी स्पर्धा घेतली जाते. मग विजेचा कमीत कमी वापर, कमीत कमी वस्तूंचा किंवा पदार्थांचा अधिकाधिक कल्पकतेनं केलेला वापर; सजावटीतील देखाव्याद्वारे संस्कृतीदर्शन, समाजातील विध्वंसक प्रवृत्तींविरोधात जागृती; समाजसुधारणेच्या नवनवीन, व्यावहारिक कल्पनांविषयी (योजनांबद्दल) उद्बोधक संदेश यावर भर असतो. ही स्वागतार्ह गोष्ट आहे.
– गणेशोत्सव काळातील कार्यक्रम केवळ स्वस्त करमणूक करणारे, कर्कश कानठळ्या बसवणारे न ठेवता, मनोरंजनातून समाजप्रबोधन करण्यावर भर दिला जातो हे सुचिन्ह आहे.
– विसर्जन मिरवणुकीतसुद्धा अश्लील चाळे, बीभत्स हावभाव व अंगविक्षेप करून केलेल्या नृत्यापेक्षा लेझिम, बर्चीनृत्य, विविध प्रदेशांतील लोकनृत्ये हे सारे अतिशय प्रभावी होते. गीत-संगीत, वादन-गायन-नर्तन, प्रकाश-ध्वनीयोजना इ. माध्यमातून प्रभावीरीत्या सादर होऊ शकतं. अगदी फटाके उडवताना कर्णकटू आवाजापेक्षा नेत्रसुखद शोभेवर अधिक भर असतो. प्रसाद वाटप, दर्शनार्थींची व्यवस्था या सार्यात प्रशिक्षित स्वयंसेवकांचा सहभाग असतो. इतकंच काय पण गणेशोत्सवाचे संयोजक व गणेश मंडळाचे कार्यकर्ते हे अधिक समर्पित भावनेने कार्यरत असतात.
ही गणेशोत्सवाची उजळ बाजू झाली, ती दरवर्षी अधिक उजळत राहिली पाहिजे. गणेश हा सर्वार्थाने लोकांचा, लोकांसाठी, लोकांनी पुजायचा देव आहे. त्याचा उत्सवही लोकांच्या अधिकाधिक सहभागानं साजरा झाला पाहिजे. नाहीतर जे वर्गणी (की सक्तीनं वसूल केलेली खंडणी?) देतात ते सामान्य लोक अशा उत्सवाच्या आयोजनात पिछाडीलाच राहणे पसंत करतात. अन् मग राजकीय गुंड नि सामाजिक पुंडांच्या हातात अटळपणे सारी सूत्रे जातात.
ही परिस्थिती अधिक तीव्रतेनं पालटायची असेल तर काय करता येईल यावर बुद्धिदात्या श्रीगणेशाच्या कृपेनंच सहचिंतन करूया.
सर्वप्रथम गणेश देवतेचं रूप-स्वरूप समजून घेऊया. तसं रूप सर्वांना परिचित आहेच. पण म्हणतात ना- ‘अतिपरिचयात् अवज्ञा’ म्हणजे अतिपरिचयामुळे मूळ सूत्र किंवा रहस्यच हरवून गेलंय. गणेश दैवताच्या रूपाच्या विशेषांवर वरवर जरी चिंतन केले तरी त्याच्या उत्सवाविषयी उचित प्रेरणा मिळू शकेल.
१. सर्वप्रथम लक्षात ठेवूया की गणेश हे सर्वसामान्य लोकांचं, शेतकरी कामकर्यांचं, बहुजन समाजाचं दैवत आहे. त्याला अगदी रेखीव आकारच असायला हवा असं नाही. अष्टविनायकांच्या मूर्तीतील अनेक तर स्वयंभू समजल्या जातात. त्यांच्यावर माणसाची कारागिरी व हातोडी-छिन्नीसारखी साधनं चालवली गेलेली नाहीत. निसर्गानंच अशा मूर्तीत त्या त्या दैवतांच्या आकारासारखा आकार घडवलेला असतो. त्यात देवत्व नि दिव्यत्व आपण आपल्या श्रद्धेतून व भक्तीतून निर्माण करायचं असतं. नि हे कार्य आपल्या देशात अनेक मूर्ती, तीर्थक्षेत्रातील देवता यांच्याबाबतीत शतकानुशतके घडत आलंय.
२. गणेश हे नुसत्या बुद्धीचं प्रतीक नाही तर स्थिरबुद्धीचं प्रतीक आहे. रोज म्हटल्या जाणार्या गणेशवर्णन व वंदनाच्या श्लोकात- ‘वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ|’ हे वर्णन झाल्यावर जी प्रार्थना आहे त्यात ‘निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा|’ असे न म्हणता ‘शुभकार्येषु सर्वदा’ असे अनेक गणेशभक्त म्हणतात. कारण समाजविघातक (चोरी, तस्करी इ.) किंवा मानवताविनाशक (अतिरेकी हिंसा, क्रूर अपराध- बलात्कार, हुंडाबळी) अशा कार्यांना (सर्वकार्येषु सर्वदा) सतत निर्विघ्न यश मिळत राहावं ही प्रार्थना कशी योग्य ठरेल?
गणेश अथर्वशीर्ष स्तोत्रात ‘त्वं मूलाधारस्थितोसि नित्यम्’ असं अप्रतिम वर्णन केलंय… त्यात गणेशदेवतेचे कोणते पैलू वर्णन केलेयत? ‘हे गणेशा, तू मूल-आधार-स्थित-नित्य’ असा आहेस. साहजिकच गणेशाची मूर्ती स्थिर संतुलनाचं, शाश्वत स्थिरतेचं, नित्य स्थितीचं प्रतीक म्हणून गोलाकार असते. एखादा चेंडू जसा कोणत्याही अवस्थेत स्थिर-स्तब्ध-नित्य संतुलनाचं (स्टेबल इक्विलिब्रियम्) उदाहरण असतो, तसा आपला गणेशही तोल न जाण्याच्या बुद्धीचं प्रतीक आहे. अनेक असुरांचा संहार करताना, दुष्टांना शाप देताना त्याची वृत्ती त्या सार्यांच्या उद्धाराची व दृष्टी सर्वांच्या मुक्तीचीच असते. गणेश हा नित्य शांत, तृप्त, शुद्ध, बुद्ध, सिद्ध, मुक्तच असतो. उत्सवातून जरी नाही तरी गणेश उपासनेतून या वृत्तीचा संस्कार आपल्या मनावर झाला पाहिजे.
३. गणेश हा गोपाळांचा (गुरे राखणार्यांचा) देव आहे. गुरांना आवडतं ते गवत दुर्वारूपानं त्याला अर्पण करायचं असतं. त्याप्रमाणे तो शेतकर्यांचाही देव आहे. पीक काढायचं असेल तर शेतातले तण काढून ते गवत दुर्वा भावनेनं गणेशाच्या पायावर किंवा अगदी माथ्यावरही वाहायचं. कारण ते शेतीला मारक असलं तरी जनावरांना उपकारक आहे. अशी गवतासारखी तुडवली जाणारी वस्तू तिच्यातली गुप्त दिव्यता जाणवल्यावर वेगळ्याच तेजानं उजळून निघते.
४. अशी सूक्ष्म दृष्टी गणेश आपल्याला देतो म्हणून त्याचे डोळे चेहर्याच्या मानानं सूक्ष्म असतात. आरती करताना कितीजणांची दृष्टी गणेशमूर्तीच्या म्हणजेच गणेशाच्या डोळ्यांवर असते? अनेक मूर्तींच्या दोन डोळ्यांची दृष्टी काहीशी वेगळी जाणवेल. एक डोळा भक्तांकडे कृपादृष्टीनं पाहत असतो- तो जरा खालच्या दिशेने पाहत असतो तर दुसरा डोळा समांतर, क्षितिजापलीकडे अनंताचा वेध घेणारा ज्ञानदृष्टीचा असतो. आपण गणेशाच्या डोळ्यांकडे पाहिलं मात्र पाहिजे.
५. गणेशाचे शूर्पकर्ण (सुपासारखे मोठे कान) दोन गोष्टी सुचवतात. एक- ऐकाल ते निवडून-पाखडून घ्या. ‘ऐकावे जनाचे पण करावे मनाचे’ असं म्हणण्यात लोकांनी हिताच्या गोष्टी सांगितल्या तरी आपण आपलीच मनमानी करत राहायचं असा नाही, तर सर्वांचं सगळं ऐका पण स्वतः विचार करून नंतर निर्णय व कृती करा असा संदेश गणेश देतो आपल्या मोठ्या कानातून. दुसरी गोष्ट- खूप ऐका, सर्व दिशांनी येणारे चांगले विचार श्रवण करा, संस्कार ग्रहण करा हा अर्थ यात सूचित आहे. ‘बहुश्रुत’ म्हणजे विद्वान, ज्ञानी असा अर्थ आहे. आजच्या माहितीच्या सुनामीच्या काळात माहितीचं रूपांतर ज्ञानात करून समर्थ बना, हा संदेश गणेशाचे नेत्र-कर्ण आपल्याला देत असतात. ‘आ नो भद्रा कतवो यन्तु विश्वतः|’ ही ऋग्वेदातील ऋषींची प्रार्थना हेच सुचवते- ‘सर्व दिशांनी सार्या विश्वातील सुविचार आमच्याकडे येऊदेत.’ यासाठी हवी सूक्ष्म दृष्टी व विशाल श्रुती म्हणजेच सूक्ष्म नेत्र व शूर्पकर्ण!
६. वाहन उंदीर व मेखला (कटिबंध, कमरपट्टा) नागांची याचा संबंध कसा जोडायचा? हे दोन्ही जीव स्वतंत्रपणे एक संदेश देतात तर संयुक्तपणे दुसरी गोष्ट सुचवतात. उंदीर हा काळाचं प्रतीक, रात्री अधिक कार्यरत (म्हणून वर्णानं काळा) आणि काळासारखा सारं कुरतडणारा, महाविध्वंसक, अन्नदात्या शेतकर्याचा महाशत्रू. त्याच्यावर गणेशाचं नियंत्रण किंवा स्वामित्व असतं म्हणून मूषकवाहन गणेश!
तसाच सर्प हा काळाचं प्रतीक. सरपटत जातो कसा, कधी, किती वेगानं हे कळतंही नाही. अशा काळाचं (टाइम) व कालशक्तीचं प्रतीक गणेशानं कंबरेला बांधून टाकलंय. एका अर्थानं काळावर विजय (हल्लीच्या भाषेत काळाचं प्रभावी व्यवस्थापन किंवा यशस्वी नियोजन), तर गणेश आपल्या भक्तांना कटिबद्ध (कमिटेड) होण्याची प्रेरणा देतो.
७. गणेशाची सोंड ही नको तिथं खुपसलं जाणार्या नाकाची निदर्शक नाही तर रसास्वाद ग्रहण करणार्या शक्तीची प्रतीक आहे. याबरोबरच आपल्या सोंडेच्या शक्तीनं तो दुर्जनांना धरून दूर फेकून देतो, त्याचप्रमाणे सज्जनांना कुरवाळतो. संरक्षणाचं आश्वासन देतो.
८. लंबोदर किंवा मोठं पोट हे अति खाण्याचा संदेश देत नाही तर भक्तांचे कळत नकळत होणारे अपराध पोटात घालण्याच्या गणेशाच्या उदारतेचं व क्षमाशीलतेचं प्रतीक आहे.
९. चार हातांबद्दलही असाच विचार करता येईल. पाश व अंकुश ही शस्त्रे मार्गावरून भटकलेल्यांना वठणीवर आणण्यासाठी (पाश) तर योग्य मार्गावर असलेल्यांना भटकू किंवा भरकटू न देण्यासाठी (अंकुश) असतात. त्यातून गणेशाचं विघ्नहर्ता-सुखकर्ता हे कार्य केलं जातं. पण एका हातात जो मोदक असतो तो खाद्यवस्तूचं प्रतीक नसून शक्तीचं प्रतीक असतं. कोणत्या शक्तीचं? तर मोद (आनंद) क (निर्माण करणार्या) म्हणजेच भक्तांच्या जीवनात आनंदनिर्मिती करणारी शक्ती मोदक रूपानं गणेशाच्या हातात स्थिरावलेली असते. आनंद निर्मिती हे गणेशाचं महत्त्वाचं कार्य आहे. याचा अनुभव आपल्याला गणेशोत्सवात येतोही.
१०. गणेशाच्या रूपाचं हे चिंतन गणेश उपासकांनी आवर्जून केलं पाहिजे. पण वैयक्तिक तसेच सार्वजनिक पातळीवर उत्सव साजरा करणार्यांनी अगत्यानं केलं पाहिजे. गणेश पीतांबर, नीलवर्णी वस्त्र नेसलेला अनेक चित्रातून-मूर्तीतून दिसतो. पण क्रांतीचा देव असलेला विनायक तर सारं तांबडं (रक्तवर्णी) पसंत करतो. त्याचं वस्त्र तांबडं (रक्तावस्त्र), अक्षता तांबड्या तर प्रिय फूलही लाल रंगाचं. यातला संदेश उघड आहे. लाल हा सौभाग्यसूचक (सुवासिनीचा कुंकुमतिलक) आहेच, पण हे सौभाग्य दुष्टांचं निर्दालन केल्यानंतरचं सुरक्षित सौभाग्यही आहे. असुरांना मारून समाजाला निर्भय बनवून, बुद्धी देऊन, ऋद्धी-सिद्धी देऊन म्हणजेच प्रगतिपथावर नेण्यासाठी जी क्रांती आवश्यक असते त्या क्रांतीची देवता ही विनायक गणपती हीच आहे. क्रांती रक्त मागते म्हणून गणेशाचा प्रिय रंग रक्तवर्ण म्हणजे तांबडा!
१२. जनगणमनाचा अधिनायक हे गणांचा ईश असलेल्या गणेश वा गणपतीचं खरं वर्णन आहे. लोकसंस्कृतीचा आविष्कार ज्या ज्या गोष्टीतून होतो त्याच्याशी गणपतीचा जवळचा संबंध आहे. पर्यावरणाकडे ‘दिव्यत्वाची प्रचिती’ घेत ‘कर माझे जुळती’ची अनुभूती घेणं हा खरा आपल्या प्राचीन संस्कृतीचा विशेष आहे. गणेशोत्सव ही लोकसंस्कृतीचं दर्शन घडवण्यासाठी सुवर्णसंधी असते.
१३. पुराणात सांगितल्या गेलेल्या कथा लोकवाङ्मयाच्या अंगानं अनेकदा जातात. पर्यावरणाचा प्रमुख भाग म्हणजे वृक्षवल्लीवनस्पती! पायदळीच्या गवतापासून उंच वृक्षापर्यंत सार्यांना पावित्र्याचं वलय देण्याचा संस्कार जनमानसावर घडवणं हा गणेशपूजेचा महत्त्वाचा भाग आहे. हरळी, गवत, तृण यांना दुर्वांचं माहात्म्य देणं यात फार मोठा सृष्टिवैभवाचा, निसर्गसंवर्धनाचा संदेश आहे. त्यासाठी दुर्वेची कथा निर्माण झाली. आज हे सारं हास्यास्पद वाटणं हा आपण स्वतःवर करत असलेला मोठा अन्याय आहे.
अनेक पुराणकथा, त्यांतील रूपकं, प्रतीकात्मकता अन् तत्त्वबोध यांवर थोडासा विचार केला तरी उद्बोधक असतात. त्या काळातील समाजमनाशी व जाणिवांशी या कथा सुसंगत होत्या. आजही त्यांचा संदेश व संस्कार मोलाचा आहे.
दुर्वा ही ब्रह्मदेवाच्या शरीरातून निर्माण झालेली सुंदर देवता. तिनं तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतलं. पुढे आपल्या ऐश्वर्याचा अहंकार तिच्या मनात जागा झाला. स्वतःला ती गणेशाची माता साक्षात् जगदंबा पार्वतीपेक्षा श्रेष्ठ समजू लागली. पार्वतीनं हा अहंकार तृणतुच्छ करण्यासाठी तिला पृथ्वीवर तृणाचं (गवताचं) रूप घ्यायचा शाप दिला. तिनं या रूपात पुन्हा तप करून आपला उद्धार करून घेतला. परत स्वर्गात जाताना अंशरूपानं पृथ्वीवरही राहण्याचा निर्णय घेतला. गणेशानं प्रसन्न होऊन तिला आपल्या माथ्यावर धारण करण्याचं वचन दिलं. जशी हरिप्रिया किंवा विष्णुप्रिया तुळस तशी ही गणेशप्रिया दुर्वा! गणेशाला वाहून प्रसन्न करण्याच्या निमित्तानं दुर्वा काढल्या जाऊन चांगली पिकं निघावीत हा उद्देश लोकजीवनाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे.
तशीच गणेशपूजनात त्याला वाहिली जाणारी पत्री. वृक्षांना अशी देवतुल्य पवित्रता दुसर्या कोणत्या संस्कृतीत आढळते? आणि तीही पिढ्यान्पिढ्या, शतकानुशतके अखंड चालू असलेली. आपल्या अनेक उत्सवांतून अशा मंगल परंपरांचे प्रवाह वाहत असताना दिसतात. शमी-मंदार अशा वृक्षांच्या जन्म-तप-वर-शाप-मुक्ती यांचं वर्णन करणार्या कथा आणखी एक गोष्ट साधतात- ती म्हणजे, सर्वत्र चैतन्याचा साक्षात्कार घडवणं नि त्याचा अनुभव घेणं. भावबंध निर्माण करणं.
१२. गणेशोत्सवात सादर केल्या जाणार्या उपक्रमात अगदी रक्तदान-नेत्रदान-श्रमदान अशा यज्ञस्वरूप गोष्टींपासून चर्चासत्रं, प्रवचनं-कीर्तनं, महान कार्य करणार्या व्यक्तींचे सत्कार- मुलाखती, राष्ट्रउभारणीतील विविध वयोगटांना- समाजघटकांना मार्गदर्शन करणारे, स्फूर्ती देणारे तसेच निखळ मनोरंजनाचे कार्यक्रम असतात. अकरा दिवसांचा सार्वजनिक उत्सव संपल्यावर पुढच्या साडेतीनशे दिवसांतही अनेक समाजोपयोगी विधायक उपक्रम हाती घेतले जातात. वेश्यांचं आरोग्य; त्यांच्या मुलांचं शिक्षण; निराधार व्यक्तींना आधार देणार्या संस्था; उद्योगातून गुणवंतांना-कलावंतांना सर्व प्रकारचं साह्य असे अनेक उपक्रम मोठी गणेशमंडळे आपल्या उर्वरित निधीतून करताहेत, ही आशादायी घटना आहे.
एकूण सारा गणेशोत्सव लोकजीवनाशी सर्व पातळ्यांवर संपर्क व संबंध असलेला, लोकसंस्कृतीचा कल्याणकारी संस्कार घडवणारा, राष्ट्रीय व भावनिक एकात्मतेचा संदेश देणारा चैतन्योत्सवही आहे. त्याचा राष्ट्रउभारणीसाठी संधी व माध्यम म्हणून प्रभावी उपयोग करून घेण्याचा संकल्प करूया! त्यासाठी शक्ती-बुद्धी-स्फूर्ती श्रीगणेशाकडेच मागूया…
॥ गं गणपतये नमः॥