खराब झालेला ५० मेट्रिक टन कांदा परत पाठवला ः गावडे

0
235

नागरी पुरवठा खात्याने सुमारे ५० मेट्रिक टन खराब कांदा नाफेडला परत पाठविला असून कांदा बदलून देण्याची सूचना केली आहे. स्वस्त धान्य दुकानदारांनी रेशन कार्डधारकांना खराब कांद्यांचे वितरण करू नये. चांगल्या कांद्यांचे वितरण करावे अशी सूचना केल्याचे नागरी पुरवठा मंत्री गोविंद गावडे यांनी काल सांगितले.

नागरी पुरवठा खात्याने सुमारे साडेतीनशे मेट्रिक टन कांदा आणला होता. या कांद्यांमध्ये खराब कांदासुद्धा आढळून येत आहे. स्वस्त धान्य दुकानदारांनी खराब कांदा मिळालेला असल्यास नागरी पुरवठा खात्याच्या तालुका निरीक्षकांशी संपर्क साधून कांदा बदलून घ्यावा, असे आवाहन मंत्री गावडे यांनी केले.

नागरी पुरवठा खात्याने नाफेडकडून कांदा खरेदी केला आहे. त्यांना खराब कांद्याबाबत माहिती देण्यात आली. कांदा बदलून न दिल्यास देण्यात आलेली रक्कम परत करण्याची सूचना करण्यात आली आहे. नाफेडने खराब झालेल्या कांदा बदलून देण्याचे मान्य केले आहे. सुमारे ५० मेट्रिक टन कांदा परत पाठविण्यात आला आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.
नागरी पुरवठा खात्याकडून चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्यांना खराब कांदा मिळाला त्यांना कांदा बदलून दिला जाणार आहे. नागरी पुरवठा खात्याच्या अधिकार्‍यांना कांद्याची तपासणी करून घेण्याची सूचना करण्यात आली आहे. खराब कांदा आढळून आल्यास परत पाठविण्याची सूचना करण्यात आला आहे. सरकारच्या निर्णयानुसार रेशन कार्डधारकांना कांद्याची विक्री केली जात आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.