खनिज वाहतूकविरोधी आंदोलनावेळी हनुमंत परब यांना पोलिसांकडून मारहाण

0
10

>> १५ जणांना अटक व जामिनावर सुटका

पिसुर्ले येथील खाण कंपन्यांच्या खनिज वाहतुकीविरुद्ध आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना काल घटनास्थळावरूनच अटक केली. या अटकेनंतर आंदोलनाचे नेतृत्व करीत असलेल्या हनुमंत परब यांना वाळपई पोलिसांनी जबर मारहाण केली. त्यात ते जखमी झाले.

पिसुर्लेतील शेतकर्‍यांनी चार दिवसांपूर्वी खनिज वाहतूक बंद करावी, यासह अन्य काही मागण्या केल्या होत्या. तसेच त्या मागण्या मान्य केल्या नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार गुरुवारपासून हनुमंत परब यांच्या नेतृत्वाखाली पिसुर्लेतील शेतकर्‍यांनी खाण कंपन्यांविरोधात आंदोलन सुरू केले; पण मतमोजणी असल्याने गुरुवारी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही; परंतु काल सकाळी ११.३० वाजता हनुमंत परब यांच्यासह १५ आंदोलकांना वाळपई पोलिसांनी अटक करून वाळपई पोलीस स्थानकात आणले. त्यावेळी हनुमंत परब व पोलीस यांच्यात वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी परब यांना मारहाण केली. परिणामी त्यांचे रक्त सुध्दा वाहू लागले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.

या आंदोलन प्रकरणी १५ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला, त्यानंतर १४ जणांना उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांच्यासमोर उभे करून वैयक्तिक जामिनावर सुटका करण्यात आली, तर हनुमान परब यांची संध्याकाळी उशिरा न्यायालयाने जामिनावर सुटका केली.

दरम्यान, हनुमंत परब यांना मारहाण केल्याची माहिती मिळताच वाळपईतील काही शेतकर्‍यांनी उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांची भेट घेतली आणि मारहाणीबद्दल माहिती दिली.

उपअधीक्षक, निरीक्षकांकडून मारहाण

उपअधीक्षक सागर एकोस्कर व वाळपई पोलीस निरीक्षक प्रज्योत फडके आणि ४-५ पोलिसांकडून आपणास जबर मारहाण करण्यात आली. सुमारे दीड तास माझे रक्त वाहत होते; पण मला इस्पितळात नेले नाही, अशी माहिती हनुमंत परब यांनी दिली.