क्षणभंगुर ते आयुष्य

0
4
  • कु. आकांक्षा अनंत नाईक (कासारवर्णे, पेडणे- गोवा)

कालचीच गोष्ट. आमच्या सहकारी शिक्षिकेने नवीन गाडी घेतली. नवीन गाडीत बसून फिरण्यात काही वेगळीच मजा असते. त्यामुळे आम्ही सर्वांनी त्यांच्यामागे ‘आम्हाला नव्या गाडीत बसवून फिरायला न्या’ असा तगादाच लावला अन्‌‍ त्या तयारही झाल्या. आम्ही सगळीजणं (सहकारी शिक्षक) त्यांच्या गाडीत बसलो. टिचरने गाडी स्टार्ट केली अन्‌‍ गेटबाहेर काढली तर दोन कुत्र्यांची पिल्ले तिथे खेळत होती, ती काही केल्या बाजूला सरेनात. शेवटी आम्ही गाडीतून उतरून त्यांना खेळवत बाजूला केले. ही दोन्ही पिल्ले खूप सुंदर होती. एक काळाकुट्ट ब्लॅकी अन्‌‍ दुसरा चॉकलेटी रंगाचा होता. त्याला आम्ही ‘चॉकी’ नाव ठेवले होते. आम्ही मधल्या सुट्टीत जेव्हा जेव्हा गेटबाहेर जायचो तेव्हा ही पिल्ले आम्हाला तिथे खेळताना दिसायची. त्यामुळे त्यांच्याशी जवळीक झाली होती. त्या दिवशी टिचरसोबत जातानादेखील ती नेहमीसारखी तिथे खेळत होती.

आमच्या शाळेच्या गेटबाहेरच एक मुख्य रस्ता आहे. आम्ही त्या पिल्लांना बाजूला करून गाडीत बसलो. टिचरने गिअर बदलत गाडीचा वेग वाढवत गाडी मुख्य रस्त्यावर घेतली. आम्ही गाडीतील पहिल्या प्रवासाचा आनंद लुटत लगेचच पाच मिनिटांच्या आत पुन्हा शाळेजवळ आलो. पाहतो तर काय, कोणत्या तरी गाडीने ब्लॅकीला ठोकर दिली होती व तो रक्तबंबाळ अवस्थेत मरून पडला होता. त्याला पाहून आम्हाला खूप वाईट वाटले. ब्लॅकीच्या अशा अचानक जाण्याने ते दुसरे पिल्लूही खूप दुःखी, घाबरेघुबरे, एकाकी झाले होते.

क्षणभरापूर्वीचे चित्र पार पालटून गेले होते. त्या पिल्लांच्या आनंदावरही दु:खाची झालर पसरली होती. मृत्यू हा कुणाला केव्हा, कसा, कुठे व कधी येईल हे सांगता येत नाही. खरोखरच, माणसाचे जीवनही असेच असते नाही का? आताच्या क्षणाला असलेला माणूस लगेचच नाहीसा होतो. त्यामुळे आताचा क्षण माझा आहे असं समजून जगा, कारण हे आयुष्य क्षणभंगुर आहे!