पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी क्वाड शिखर परिषदेतही सहभाग घेतला. यावेळी बोलताना, पंतप्रधान मोदी यांनी क्वाडचे महत्त्व आणि त्याची उपयुक्तता यावर भर दिला. तसेच क्वाड देशांचे एकत्र येणे हे मानवतेसाठी अतिशय आवश्यक असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
क्वाड परिषदेत बोलताना मोदी म्हणाले की, अमेरिकेने कमी कालावधीत या परिषदेला चांगले सहकार्य केले आहे. या परिषदेत अमेरिकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. लोकशाही मूल्यांच्या आधारावर क्वाडने एकत्र काम करणे मानवतेसाठी खूप आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था, प्रादेशिक अखंडता आणि इतर सर्व समस्यांचे शांततापूर्ण निराकरण व्हायला हवे, असे त्यांनी यावेळी नमूद केले.