क्रीडा संकुलात आसरा घेतलेल्या बायणा येथील विस्थापितांना हटविले

0
97
बुटेभाट - वास्को येथील क्रीडा संकुलातून मुलाबाळांसह काढता पाय घेताना बायणा येथील विस्थापित. (छाया : सुदेश भोसले)

कडेकोट पोलीस बंदोबस्तात उपजिल्हाधिकार्‍यांची कारवाई
बुटेभाट – वास्को येथील क्रीडा प्राधिकरणाच्या संकुलात आपला संसार थाटून बसलेल्या बायणा येथील विस्थापितांना अखेर काल पोलिस बंदोबस्तात हटविण्यात आल्याने तेथील नागरिकांनी अखेर सुटकेचा श्‍वास सोडला. जुलै ११ व २१ रोजी अशा दोन टप्प्यांत बायणा येथील समुद्र किनारी थाटण्यात आलेली तसेेच धोक्याच्या विभागात येणारी बेकायदेशीर घरे पाडण्यात आली होती. नंतर या लोकांच्या पुनर्वसनाचा विचार करून सरकारने उपाययोजना म्हणून आठ दिवस पुरेल एवढे अन्न व तात्पुरत्या निवार्‍याची व्यवस्था केली होती. पण काही स्थानिक नेत्यांनी तसेच गोव्याबाहेरून आलेल्या कन्नड नेत्यांनी या सर्व विस्थापितांना भडकावून सरकारच्या मदतीला धुडकावून लावण्यास प्रवृत्त केले होते.
त्यानुसार या लोकांनी सरकारची कोणतीच मदत घेतली नव्हती. आपल्याला फुकटचे अन्न तसेच तात्पुरता निवाराही नको म्हणून विस्थापितांनी कायम निवार्‍यासाठी हट्ट धरून बायका-मुलांसह अखेर तात्पुरत्या निवार्‍यासाठी बुटेभाट येथील गोवा क्रीडा प्राधिकरणाचे संकुल गाठून तेथे ठाण मांडले होते. सदर लोकांनी तेथे आपला संसार थाटला होता. या लोकांनी तेथे ठाण मांडल्याने या क्रीडा संकुलात येणार्‍या क्रीडापटूंत नाराजी पसरली होती. तसेच येथील स्थानिक लोक या विस्थापितांपासून हैराण झाले हेते.
या सर्व तक्रारींची दखल घेऊन उपजिल्हाधिकार्‍यांनी काल १७ तारीखपर्यंत संकुल खाली करण्याची नोटीस बजावली होती. सदर नोटिसीला न जुमनता विस्थापित संसार थाटून बिनधास्त होते. पण काल उपजिल्हाधिकार्‍यांनी कडक अंमलबजावणी करून अखेर त्यांना काढता पाय घेण्यास प्रवृत्त केले. सकाळी १ वाजेपर्यंत या लोकांनी सदर संकुल खाली करण्याचे नाव न काढल्याने अखेर पोलीस बंदोबस्तात या लोकांना तेथून हटविण्यात आले. मात्र, संध्याकाळी या विस्थापितांनी वास्को येथे मुरगाव पालिकेसमोर धरणे कार्यक्रम सुरू केला.
कालच्या कारवाई दरम्यान उपजिल्हाधिकारी गौरीश शंखवाळकर, मामलेदार लक्ष्मीकांत देसाई, वास्को पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर उपस्थित होते.