क्रीडाकुंभमेळा

0
42

सदतिसाव्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांचा महाकुंभमेळा कालपासून गोव्यात औपचारिकपणे सुरू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थितीही त्यानिमित्ताने लाभली. खरे तर ह्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांचे यजमानपद गोव्याकडे 2016 सालीच येणार होते, परंतु तेव्हा गोव्याचे ते स्वप्न साकारू शकले नव्हते. आता सात वर्षांनंतर का होईना, राष्ट्रीय क्रीडास्पर्धांच्या आयोजनाचे शिवधनुष्य क्रीडामंत्री गोविंद गावडे व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोवा सरकारने पेलले आहे. नामांकित इव्हेंट मॅनेजमेंट संस्थांचा आणि पी. आर. एजन्सींचा सहभाग असल्याने ह्या क्रीडास्पर्धांच्या झगमगाटात कोठेही कमतरता येणार नाही हे तर ओघाने आलेच, पण ह्या निमित्ताने गोव्याच्या क्रीडाजगताला नवसंजीवनी मिळावी, गोव्याच्या पर्यटनाला क्रीडापर्यटनाचे एक नवे परिमाण लाभावे अशीही गोमंतकीय जनतेची अपेक्षा आहे. देशातील अठ्ठावीस राज्ये आणि आठ संघप्रदेशांतील मिळून दहा हजार खेळाडूंची उपस्थिती गोव्यातील ह्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमध्ये लाभणार आहे. तब्बल 43 क्रीडाप्रकारांचा ह्या स्पर्धांत समावेश आहे आणि यावर्षी काही क्रीडाप्रकार नव्याने त्यात समाविष्ट झाले आहेत, तर काही क्रीडाप्रकारांचे ह्या स्पर्धेत पुनरागमनही झालेले आहे. गेल्या वर्षीच्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धा गुजरातमध्ये विविध शहरांतून झाल्या होत्या. त्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी विविध सेनादलांची होती. त्यांनी सर्वाधिक 61 सुवर्णपदके, 35 रौप्यपदके, 32 कांस्यपदके मिळून 128 पदकांवर आपली मुद्रा कोरली होती. त्या खालोखाल महाराष्ट्राची आणि हरियाणाची कामगिरी होती. गोव्यानेही गेल्या वर्षीच्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमध्ये पाच पदके पटकावली होती. यंदा ह्या एवढ्या मोठ्या स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी गोव्याला मिळाली आहे आणि त्यानिमित्ताने गोमंतकीय क्रीडाजगतामध्ये एक नवे चेतनापर्व येईल अशी अपेक्षा आहे.
हल्लीच चीनमध्ये पार पडलेल्या आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये भारतीय चमूने अत्यंत चमकदार कामगिरी करून देशाच्या अपेक्षा उंचावल्या. 2036 सालच्या ऑलिम्पिक स्पर्धा भारतात भरविण्याचा मानस स्वतः पंतप्रधान मोदींनी बोलून दाखवलेला आहे. गोव्याने यापूर्वी लुसोफोनियासारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे. राष्ट्रीय क्रीडास्पर्धांचे आयोजन हा गोव्यासाठी एक संस्मरणीय अनुभव ठरेल यात शंका नाही. क्रिकेट आणि फुटबॉलच्या पलीकडील विविध क्रीडाप्रकारांबाबत समाजामध्ये सहसा अनास्थाच दिसते. त्यामुळे त्या क्रीडाप्रकारांत कर्तृत्व गाजवणाऱ्या खेळाडूंची आपल्याकडे उपेक्षाच होत असते. हे चित्र बदलण्याची गरज आहे आणि त्यादृष्टीने राष्ट्रीय क्रीडास्पर्धांसारख्या महत्त्वपूर्ण क्रीडास्पर्धांचे दिमाखदार आयोजन आणि विपुल प्रसिद्धी आवश्यक आहे. आशियाई क्रीडास्पर्धांत पदके कमावल्यानंतरच अनेक खेळाडूंची नावे भारतीयांना परिचित झाली. असे होता कामा नये. विविध क्रीडाप्रकारांमध्ये राष्ट्रीय स्तरावर नाव कमावणाऱ्या खेळाडूंचाही परिचय देशाला घडला पाहिजे. गोव्यासारख्या छोट्या राज्यातील क्रीडापटूंनाही त्यापासून प्रेरणा घेता येईल. गोवा हे आकाराने छोटे राज्य असले तरी आजवर असंख्य खेळाडूंनी राष्ट्रीयच नव्हे, तर अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील गोव्याचे नाव मोठे केले आहे. त्यामुळे राष्ट्रीय क्रीडास्पर्धांच्या निमित्ताने गोव्याच्या नव्या पिढीच्या विविध क्रीडाप्रकारांबाबतच्या प्रेमाला जर चालना मिळाली तर ते भविष्यातील यशस्वी कामगिरीसाठी आवश्यक ठरेल. विविध क्रीडाप्रकारांना चालना देण्यासाठी वास्तविक स्वतंत्र संघटना असतात. मात्र, बहुतेक संघटनांवर खेळाडूंपेक्षा राजकारण्यांचे आणि त्यांच्या बगलबच्चांचेच वर्चस्व राहते. ह्या विळख्यातून क्रीडा संघटनांना मोकळे करून तेथे केवळ त्या त्या खेळात कर्तृत्व दाखवलेल्या खेळाडूंच्या हाती त्यांचा कारभार सोपवला गेला, तर आपल्यामागून नवे खेळाडू तयार व्हावेत व त्यांनी आपल्याहून मोठे यश प्राप्त करावे यादृष्टीने ते प्रयत्न करू शकतील आणि सरकारला दिशा दाखवू शकतील. सर्व क्रीडाप्रकारांनाही सारखेच उत्तेजन देण्याचे विद्यमान सरकारचे धोरण आहे. त्यादृष्टीने प्रयत्नही चालले आहेत. देशभरामध्ये नवनव्या क्रीडासुविधा उभारल्या जात आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाची स्टेडियम्स उभी राहत आहेत. मैदाने विकसित केली जात आहेत. ह्या क्रीडास्पर्धांच्या निमित्ताने गोव्यातील क्रीडाक्षेत्राच्या स्थितीचा समूळ आढावा घेतला गेला, गावोगावच्या क्रीडामैदानांना सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न झाला, विविध क्रीडाप्रकारांना चालना देण्याच्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न झाले, तर आगामी राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमध्ये गोमंतकीय खेळाडूही आपल्या कामगिरीचा ठसा उमटवू शकतील. गोमंतकीय क्रीडाविश्वाला नवसंजीवनी देण्यासाठीचे ह्या स्पर्धा हे प्रेरणास्थान ठरावे.