>> कारखाली चिरडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
श्रीलंका क्रिकेट संघातील नियमित सदस्य असलेल्या कुशल मेंडीस याच्या कारखाली चिरडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ‘हिट अँड रन’ प्रकरणी कुशल मेंडीसला कोलंबो पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलीस प्रवक्ता एसएसपी जालिया सेनारत्ने यांनी मेंडीसच्या अटकेची पुष्टी केली आहे.
कोलंबोपासून ३० किमी दूर असलेल्या पानादुरा शहरात आज सकाळी (रविवार) हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी २५ वर्षीय कुशल कार चालवत असल्याची माहिती आहे. ६४ वर्षीय वृद्ध व्यक्ती सायकल चालवत होती. अपघातानंतर या व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. श्रीलंकन पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कुशलला अटक केली आहे. मेंडीस दारुच्या नशेत गाडी चालवत होता का याचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत.
कुशल मेंडीस हा श्रीलंका क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज आहे. मेंडीसने श्रीलंकेकडून ४४ कसोटी सामन्यांमध्ये २९९५ धावा केल्या आहेत. तर ७६ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने २१६७ धावा रचल्या आहेत. कुशलने २६ टी-ट्वेंटी सामन्यांमध्ये ४८४ धावाही ठोकल्या आहेत. कोविड लॉकडाऊननंतर मैदानात उतरलेल्या प्रशिक्षण शिबिराचा तो भाग होता.
श्रीलंकेत रस्ते अपघातात दरवर्षी ३ हजारपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू होतो. महिला पादचार्याचा कारच्या धडकेत मृत्यू झाल्या प्रकरणी २००३ मध्ये माजी फिरकीपटू कौशल लोकुआराचीला चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.